मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला फिटनेसचे प्रचंड वेड आहे. फिटनेसबाबत ती नेहमीच काळजी घेत असते. सोशल मीडियावर फारच सक्रिय असणारी प्राजक्ता व्यायाम करतानाचे काही व्हिडीओ शेअर करत असते. आतादेखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती एकाच वेळी चक्क १०८ सूर्यनमस्कार करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
योगा आणि प्राणायम हा प्राजक्ता माळीचा आवडीचा विषय आहे. आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत ती योगा आणि प्राणायमकडे विशेष लक्ष देते. तिच्या दिवसाची सुरुवातच व्यायामाने होते. प्राजक्ताच्या व्यायामामध्ये सूर्यनमस्कारचादेखील समावेश असतो. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते पाहायला मिळते. एकाच वेळी तब्बल १०८ सूर्यनमस्कार करताना प्राजक्ता कुठेही दमली नसल्याचे तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
https://www.instagram.com/tv/Ce7o7yIgne0/?utm_source=ig_web_copy_link
सकाळी रम्य वातावरणामध्ये सूर्यनमस्कार आणि व्यायाम करण्याची मजा काही औरच असते. हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ता माळीने म्हटले आहे की, “जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मी आज १०८ सूर्यनमस्कार केले. योग दिन हा २१ जूनला असतो. कदाचित या दिवशी मी पुन्हा सूर्यनमस्कार करेन; पण तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर करणार असाल तर…काय म्हणता करणार का? तुम्हाला जमेल तितके करा”, असे म्हणत २१ जूनला योग दिनाच्या निमित्ताने माझ्याबरोबर सगळ्यांनी सूर्यनमस्कार करा, असे प्राजक्ताने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. योग आणि प्राणायम यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम होते आणि तुम्ही निरोगी राहता, हे प्राजक्ता नेहमी सांगते. प्राजक्ता स्वतः या सगळ्या गोष्टी फॉलो करते. योग आणि प्राणायमच तिच्या फिटनेसचे रहस्य आहे, असे ती सांगते.
प्राजक्ताने आपले दिवसभराचे एक वेळापत्रक तयार केले आहे. सकाळी लवकर तिचा दिवस सुरू होतो. सकाळी सातच्या सुमारास घराच्या गच्चीवर ती योगासने करते. तिच्या अष्टांग योगचे व्हिडीओ ती एक दिवसाआड अपलोड करत असते. या व्हिडीओंमधून ती योगासनांचे महत्त्वदेखील सांगत असते. योगासने करणे हे नेहमीच फायदेशीर असते. त्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे. न चुकता योग करण्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. सध्या त्याची अधिक गरज आहे, म्हणून मी हे व्हिडीओ करते आहे. यातून सर्वांना योगासने करता येतील. तसेच आपला वेळ कसा घालवावा, आवडीच्या कोणत्या गोष्टी कराव्या हे इतरांनाही कळू शकेल, असे प्राजक्ता सांगते.
‘रामायण’ ही मालिका पाहणे तिला आवडते. सकाळी आणि रात्री न चुकता ती ‘रामायण’ पाहत असते. याशिवाय, दिवसभरात वाचन, चित्रपट पाहणे, वेब सीरिज पाहणे सुरू असते. तिला विविध पदार्थ खायला आवडतात. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले राहावे म्हणून प्राजक्ता माळी करत असलेल्या प्रयत्नांना चाहतेही चांगला प्रतिसाद देत आहेत.