विधान परिषदेच्या निवडणुकीत चमत्कार तर घडणारच आहे; पण…

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल; पण तो कोणाच्या बाजूने घडेल हे सोमवारी पाहायला मिळेल. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आमची रणनीती ठरली आहे. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा दावा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळे दिसेलच. ११ पैकी १० उमेदवार निवडून येणार आहेत, एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्या बाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहोत. जे २६ मतांचा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल. राज्यसभेच्या निवडणुकीवेळी जी काही चूक झाली ती यावेळी होणार नाही. यावेळी उमेदवारांचा कोटा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. मत बाद होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पवार म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार उभे आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सहा उमेदवार उभा केलेले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. मागील दोन दिवस मी विविध बातम्या पाहतोय, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की, आम्ही सगळेजण महाविकास आघाडीचे हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहोत. प्रत्येक पक्ष स्वत:च्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. आमच्या आमदारांना एकत्र बोलावून त्यांना १ ते १० पसंतीक्रम कसा द्यायचा यासंदर्भात माहिती देणार आहोत. १ ते २ आकडे आमच्या उमदेवारांना दिले तरी ३ ते ४ क्रमांक कुणाला द्यायचा हे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील हे अंतिम क्षणी निर्णय घेतील.

…आणि त्याची किंमत शेवटी मोजावी लागते
एक गोष्ट खरी आहे की, शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मते आहेत. आमच्या दोन आमदारांना मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने न दिल्याने आमची संख्या ही ५१ आहे. विजयासाठी साधारण २६ मतांचा कोटा आहे. अगदी काठावर धरून चालत नाही, कारण कालच्या राज्यसभा निवडणुकीत काय घडले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहे. त्यामुळे यदाकदाचित एखादे मत बाद झाले, काही तिथे अडचण आली, सभागृहात मतदान करत असताना कधी काय होईल सांगता येत नाही. कधी नजरचुकीने एखादी गोष्ट घडून जाते आणि त्याची किंमत शेवटी मोजावी लागते. जसे मागील वेळेस शिवसेनेच्या एका आमदाराने दिलेले मत बाद ठरवण्यात आले म्हणून आता आम्ही सगळेजण काळजी घेतोय, कोटा जास्त कसा देता येईल याबद्दलचा प्रयत्न करतोय, असे अजित पवारांनी सांगितले.

अपक्षांना काहींनी फोन केले हे खरे
अपक्षांकडे सन्मानाने मतं मागितली पाहिजेत. काही उमेदवारांनी अपक्ष आमदारांना फोन केले हे खरे आहे. मी स्वत: अनेकांना फोन केले. अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी अनेकांना फोन केले. पहिले आणि दुसरेच मत महत्वाचे नाही, तर तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांकही महत्वाचा असतो. एक आणि दोन मते एकमेकांना दिल्यानंतर तीन आणि चारबद्दल आम्ही ठरवू. आम्हाला थोड्या मतांची गरज आहे. मात्र, तीन ते चार उमेदवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणे ते मतदान करतील, असे सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.

शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येणार
शिवसेनेचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येतील. आमच्या दोन आमदारांना (अनिल देशमुख आणि नवाब मलिक) मतदानाची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे अपक्षांची मदत घेऊन आमच्या उमेदवारांना कसे निवडून आणायचे याचे नियोजन आम्ही करत आहोत. अपक्ष आमदारदेखील पाच-पाच लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करतात. अपक्ष आमदारांचा सन्मान करून त्यांची मते मिळवून आपल्या उमेदवारांना कसे विजयी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे. आमच्या आमदारांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. आमच्या पक्षातील आमदारांवर दबाव करण्यात टाकण्यात आल्याची माहिती अजून तरी मिळालेली नाही, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

‘अग्निपथ’ योजनेच्या विरोधात देशभरात युवकांचा रोष निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे. त्यावर आता केंद्र सरकारने यामध्ये आणखी दोन वर्षांची वाढ केली. हे आधीच व्हायला हवे होते. राज्यातील युवकांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होईल असे कृत्य करू नये, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

Share