मुंबई : मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काॅँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. राज्यात नवं सरकार आल्यावर बँकेतही सत्तांतर झाल्याचं या निमित्ताने दिसून आलं.
सहा महिन्यांपूर्वी प्रवीण दरेकरांना धक्का देत महाविकास आघाडीने बँक ताब्यात घेतली होती. मात्र आता शिंदे फडणवीस सरकार येताच पुन्हा सत्तांतर झालं आहे. प्रविण दरेकर यांची गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवर सत्ता होती. मात्र सहा महिन्यांपूर्वी ती महाविकास आघाडीने खेचून घेतली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: यावेळी निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते.
दरम्यान, मुंबई बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता. तर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता अध्यक्षपदी प्रवीण दरेकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे.