प्रवीण तरडेंनी वडिलांच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

मुंबई : ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’, ‘सरसेनापती हंबीरराव’ यासारखे सुपरहिट चित्रपट देणारे आघाडीचे अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. त्यांच्या चित्रपटांचे व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. आता प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. हा व्हिडीओ खूप खास आहे. कारण, प्रवीण तरडे यांनी त्यांच्या वडिलांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रवीण तरडे यांचे वडील विठ्ठल तरडे शेती करता करता विठ्ठल भक्तीत रंगल्याचे दिसत आहे.

प्रवीण तरडे यांच्या वडिलांचे नाव आपण अनेकदा वाचले असेल. कारण, प्रवीण तरडे हे नेहमीच आपल्या नावासोबत त्यांच्या वडिलांचे नाव लिहितात. सिनेमाचे क्रेडिट रोल असो किंवा सोशल मीडियावरील प्रोफाईल असो, ते नेहमीच ‘प्रवीण विठ्ठल तरडे’ असे पूर्ण नाव लिहिताना दिसतात. त्यामुळे वडिलांप्रति असणारा त्यांचा आदर नेहमीच दिसून आला आहे.

प्रवीण तरडे यांनी आता वडिलांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आज माझ्या वडिलांचा विठ्ठलरावांचा ७९ वा वाढदिवस… पुढच्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा… पांडुरंगाच्या चरणी एकच इच्छा शंभरीपर्यंत त्यांना असंच आरोग्य लाभू दे, खूप शुभेच्छा’.

प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये विठ्ठलराव तरडे हे शेतात लावणीची कामे करताना दिसत आहेत, तर या व्हिडीओमध्ये ते ‘विठूचा गजर हरिनामाचा…’ गात असल्याचे दिसते आहे. त्यांच्या उत्साहाचे सोशल मीडियावर कौतुक होत असून, त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विठ्ठलराव तरडे यांचा साधेपणा चाहत्यांना विशेष भावला आहे. ‘लेकाने कोट्यवधी कमावूनही शेतात राबतोय हाडाचा शेतकरी!’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.

https://fb.watch/dVsXDzYVM2/

बाप तो बाप होता है….
यापूर्वी प्रवीण तरडे यांनी ‘फादर्स डे’ निमित्त आपल्या वडिलांचा फोटो शेअर करून या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. प्रवीण यांनी शेअर केलेल्या फोटोपेक्षा त्यांनी दिलेल्या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा झाली होती. विशेष म्हणजे लोकप्रिय ठरलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामध्ये प्रवीण तरडे यांच्या वडिलांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

“माझ्या सिनेमात अनेक कलाकारांनी काम केलंय.. या ७५ वर्षांच्या कलाकाराने सुध्दा ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये  एका शेतकऱ्याचं काम केलंय. पहिल्याच टेकला शाॅट ओके, अजून एक टेक घ्यायचा का.? असं विचारलं तर म्हणाला ओ तरडे, हाडाचा शेतकरी आहे मी, शेतात “बी” एकदाच पेरायचं असतं आणि कसं पेरलंय ते उकरून नाय तर उगवून आल्यावरच बघायचं..त्या कलाकाराचं नाव ह.भ.प विठ्ठल किसन तरडे.. बाप तो बाप होता है”, असे कॅप्शन देत प्रवीण तरडे यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोचे चाहत्यांकडून चांगलेच कौतुक झाले होते.

https://fb.watch/dVt0G1bMGv/

प्रवीण तरडे यांच्या ‘धर्मवीर’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांचे कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. तरडे यांच्या ‘धर्मवीर’ या चित्रपटाची सध्याच्या राजकीय परिस्थितीत जोरदार चर्चा सुरू आहे. १३ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या सिनेमातील विविध दृश्ये सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Share