हा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि आनंद दिघेंच्या विचारांचा विजय..!

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह १६ बंडखोर आमदारांना बडतर्फ करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस पाठवली होती. याविरोधात शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या बंडखोरांवर १२ जुलैपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करता येणार नाही, असे निर्देश देत महाविकास आघाडी सरकारला दणका दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर गुवाहाटीमधून एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. हा निर्णय म्हणजे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सोमवारी (२७ जून) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल असताना त्यांना अपात्रतेची नोटीस देण्याचा अधिकार आहे काय? असा सवाल उपस्थित करत उपाध्यक्षांनी पहिल्यांदा बहुमत सिद्ध करावे, नंतर त्यांना नोटीस देण्याचा अधिकार आहे, असे अ‍ॅड. नीरज कौल म्हणाले. विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीसीनंतर सदस्यांना उत्तर द्यायला १४ दिवसांचा वेळ द्यायला हवा होता; परंतु केवळ ४८ तास दिले गेले. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस रद्द करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी अ‍ॅड. कौल यांनी सुप्रीम कोर्टात केली.

त्याला उत्तर म्हणून शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर शिंदे गटाच्या बंडखोरांवर १२ जुलैपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाही करता येणार नाही, असे निर्देश न्यायालयाने दिले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय बंडखोर शिंदे गटासाठी दिलासा मानला जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे शिंदे समर्थकांनी ठाण्यात फटाके फोडून, गुलाल उधळून स्वागत केले. एकनाथ शिंदे यांनीही गुवाहाटीतून ट्विट केले आहे. ‘हा निर्णय म्हणजे वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय….’ असे एकनाथ शिंदे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी त्यांनी ‘रिअल शिवसैनिक’ असा हॅशटॅगही वापरला आहे.

कोर्टाच्या निर्णयावर संजय राऊत काय म्हणाले?
दुसरीकडे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना केवळ ही कायदेशीर लढाई आहे ती चालत राहील, असे मोजक्या शब्दांत उत्तर दिले आहे.

दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार, राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे. तसेच या नोटिशीला पाच दिवसांत उत्तर देण्यास न्यायालयाने सांगितले आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस बजावलेल्या १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने १२ जुलैपर्यंत वेळ वाढवून दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे.

Share