पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करा; पंतप्रधान मोदींनी ठाकरे सरकारला सुनावले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत मोदी यांनी इंधन दरावरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले. मोदींनी इंधनावरील अर्थात पेट्रोल व डिझेलवरील ‘व्हॅट’ कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावेच या बैठकीत घेतली आणि देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना ‘व्हॅट’ कमी केला पाहिजे, असे सांगितले.

मोदी यांनी यावेळी पेट्रोलचे भाजपशासीत राज्यातील दर आणि गैर भाजपशासीत राज्यांचे दर वाचून दाखवले. गुजरात आणि कर्नाटकने कर कमी करून हजारो कोटींचे नुकसान सहन केले आणि त्यांच्या शेजारच्या राज्याने या काळात हजारो कोटी कमावल्याचा उल्लेख मोदींनी महाराष्ट्राचे नाव न घेता केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी मोदी म्हणाले, जगात युद्धस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. जागतिक संकटांच्या काळात केंद्र आणि राज्यांमधील ताळमेळ वाढवण्याची आवश्यकता आहे. इंधनाच्या वाढत्या दरांचे ओझे देशवासियांवर पडू नये यासाठी केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अबकारी कर कमी केला होता. केंद्राने राज्यांनाही कर कमी करत नागरिकांना याचा फायदा द्यावा, असे आवाहन केले होते. काही राज्यांनी केंद्र सरकारची भावना लक्षात घेत कर कमी केला; पण काही राज्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. यामुळे या राज्यांमध्ये इंधनाचे दर इतरांच्या तुलनेत जास्त आहेत. हा एक प्रकारे त्या राज्यातील लोकांवर अन्याय आहेच, मात्र शेजारच्या राज्यांचंही नुकसान करत आहे, असे सांगताना नरेंद्र मोदींनी कर्नाटक आणि गुजरातची उदाहरणे दिली.

इंधनाचे दर कमी करा
कर्नाटक आणि गुजरात जवळच्या काही राज्यांनी साडे तीन हजार ते पाच हजार कोटी रुपये कमावले. गेल्या नोव्हेंबर महिन्यात मी सर्वांना व्हॅट कमी करण्यासाठी विनंती केली होती. मी कोणावर टीका करत नसून विनंती करत आहे. त्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी सांगत आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांनी ऐकले नाही आणि त्यांच्या राज्यातील नागरिकांवरील ओझे कायम राहिले. या राज्यांनी किती महसूल कमावला हे मला सांगायचे नाही; पण आता देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी करत लोकांना याचा लाभ दिला पाहिजे. कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, मुंबई, जयपूर येथे इंधनाचे दर जास्त आहेत. दीव, दमणमध्ये दर कमी आहेत. त्यामुळे इंधनाचे दर कमी करा ही विनंती आहे, असे मोदी यांनी सांगितले.

कोरोना संकट पूर्णपणे टळलेले नाही;सतर्क राहा
कोरोना संकट अजून पूर्णपणे टळलेले नाही.  आपण इतर देशांच्या तुलनेत परिस्थिती चांगली हाताळली आहे. ओमिक्रॉन आणि त्याचे सब वेरियंटस गंभीर स्थिती निर्माण करत आहेत.  आता काही देशांमध्ये आकडे वाढत असल्याने सतर्क राहिले पाहिजे. कोणत्याही राज्यात नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेली असे कुठे आढळून आलेले नाही. लसीकरणाचा यामध्ये मोटा वाटा आहे. लहान मुलांचे लसीकरण ही आता प्राथमिकता आहे. तिसऱ्या लाटेत जास्त केसेस असतानाही व्यवहार सुरु ठेवले होते. असेच काम पुढे सुरू राहिले पाहिजे. संक्रमणाला सुरुवातीलाच रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे, असे मोदी म्हणाले. आपल्या देशात मोठ्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने पालक चिंतीत आहेत. काही शाळांमधील विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले आहे. मात्र, आता लहान मुलांना देखील कोरोना लस देण्यात येणार आहे, ही समाधानाची बाब आहे. मार्च महिन्यात आपण १२ ते १४ वर्षातील मुलांसाठी करोना लसीकरणाला सुरुवात केली. ६ ते १२ वर्षाच्या मुलांसाठी कोवॅक्सिन लसीला परवानगी देण्यात आली आहे, असे मोदी यांनी सांगितले.

आरोग्य विषयक पायाभूत सुविधा चांगल्या स्थितीत आहेत; पण यापुढे त्या कार्यरत राहतील यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे. भारताने कोरोनाची लढाई ही चांगली लढली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांनी एकत्रित सामना केला आहे आणि यापुढेही केला पाहिजे. एकत्रित प्रयत्नांमुळे आरोग्यविषयक सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे, आर्थिक नियोजनात केंद्र आणि राज्य यांच्या ताळमेळ आवश्यक आहे. आणखी एक विनंती आहे. देशात उकाडा वाढत आहे त्यामुळे आतापासून हॉस्पिटलचे सेफ्टी ऑडिट करा. तेव्हा संभाव्य दुर्घटनेपासून वाचता येईल, असे मोदी म्हणाले.

Share