केंद्राकडून सुरक्षा पुरविणे हे राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण

नागपूर : राज्यातील सर्व व्यक्तींचा सुरक्षा करण्यासाठी पोलिस सक्षम आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून गमतीशीर घडामोडी घडत आहेत. ज्यांच्यावर आरोप आहेत किंवा ज्या व्यक्तींकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत अशा व्यक्तींना सुरक्षा पुरवण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. राज्याच्या अधिकारांवर हे अतिक्रमण आहे, असा गंभीर आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे.

गृहमंत्री वळसे-पाटील यांनी आज मंगळवारी नागपूर येथे पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध प्रश्नांबाबत भाष्य केले. मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वळसे-पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवणे म्हणजे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण केले जात आहे. विशिष्ट लोकांनाच केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. केंद्र सरकारकडून राज्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप सुरू आहे. मशिदीच्या भोंग्यांबाबतही निर्णय घेण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, पोलिस महासंचालकांना राज्यभरातील पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांकडून ज्या सूचना येतील त्याआधारे दोन्ही बाजूचा विचार करून निर्णय घेतला जाईल. पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्तांची आणखी एक बैठक झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती वळसे-पाटलांनी यावेळी दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला असून, ३ मेपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत बोलताना गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, राज्यात तणाव निर्माण होईल, असे मला वाटत नाही. आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत आणि कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. महाराष्ट्रात अशांतता निर्माण केली जात आहे, हे खरे आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवरून वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाई आणि बेकारी या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी धार्मिक मुद्द्यांवर वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमरावतीतील घटनांमागे कुणाचा हात आहे, हे सर्वांना माहीत आहे. तिथे काही घटक जास्त सक्रिय झाले आहेत. त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले.

Share