एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरून हटवणे बेकायदेशीर; आम्ही कायदेशीर उत्तर देऊ : आ. केसरकर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांचा गट आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या निर्णयालाच आव्हान दिले आहे. शिंदे यांना नेतेपदावरून हटवणे बेकायदेशीर आहे. आम्ही या कारवाईला कायदेशीर उत्तर देऊ, असे आ.केसरकर यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या ३८ आमदारांसह पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (१ जुलै) मोठी कारवाई केली आहे. ‘तुम्ही पक्षविरोधी कारवायांत गुंतल्याचे स्पष्ट झाले असून, तुम्ही पक्षाचे सदस्यत्वही स्वतःहून सोडले आहे. त्यामुळे पक्षप्रमुख या नात्याने मी तुम्हाला पक्षनेतेपदावरून दूर करत आहे,’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या कारवाईवर एकनाथ शिंदे गटाकडून प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

तुम्ही कितीही डाव खेळले तरी आम्ही दबावाला बळी पडणार नाही
आज गोव्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आ. केसरकर म्हणाले, शिवसेना नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांना काढल्याचे पत्र काल आम्हाला देण्यात आले आहे. एकनाथ शिंदेंविरोधात करण्यात आलेली कारवाई शिवसेनेला शोभणारी नाही. याबाबत शिवसेनेला रीतसर उत्तर पाठवण्यात येईल. हे उत्तर दिल्यानंतरही कारवाई मागे घेण्यात आली नाही तर आम्ही कायदेशीर लढाई लढू. शिंदे यांना गटनेतेपदावरूनही काढण्यात आल्यानंतर आम्ही त्याला चॅलेंज केले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात ते राज्याचे सर्वोच्च सभागृह विधिमंडळ पक्षाचे नेते बनतात. विधिमंडळ पक्षाचे नेते असलेल्या व्यक्तीचे खालचे पद काढून घेतल्यानंतर वाईट का वाटावे? आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नेते झाले आहेत. तुम्ही कितीही डाव खेळलात तरी आम्ही दबावाला बळी पडणार नाही. हा सगळा रडीचा डाव आहे. एकनाथ शिंदे यांचे नेतेपद उजळून निघाले आहे.

उद्धव ठाकरे हे आमचे नेते; त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार नाही
उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली तरी प्रत्युत्तर द्यायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे. आमच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. मात्र, उद्धव ठाकरे हे आमचे नेते असल्याने उत्तर न देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी काहीही म्हटले तरी आम्ही काहीही बोलणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही जी मुदत दिलेली होती ती संपून गेली. आमच्या मोहिमेचे सेनापती शिंदेसाहेब आहेत. आम्ही सर्व पाश तोडून टाकले आहेत. बहुमत सिद्ध करताना आम्ही विजयी झाल्यानंतर कोणताही जल्लोष करणार नाही. जेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल, तेव्हाच आम्ही जल्लोष करू,’ अशी भूमिका आ. केसरकर यांनी मांडली आहे.

एकनाथ शिंदे हे शाखाप्रमुख होते. शिवसेना हा केडरबेस पक्ष आहे, बाळासाहेबांनी शाखाप्रमुखांना सन्मान दिला. शाखाप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे कौतुक केले असते. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की, शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर बसला पाहिजे. आता एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसैनिक मुख्यमंत्री झाला याचा आनंद आहे. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्र्याच्या गादीवर बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जवळचा आहे असे वाटत असेल; पण हा भ्रम नक्की दूर होईल. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. जोपर्यंत आम्हाला एकनाथ शिंदे सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही प्रत्युत्तर देणार नाही, असे आ. केसकर यांनी स्पष्ट केले.

पक्षात राहण्यासाठी प्रेमाचे बंधन महत्त्वाचे
पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नाही, तर प्रेमाचे बंधन महत्त्वाचे आहे. शिवबंधन हे प्रेमाचे बंधन आहे आणि आजही आमच्या हातात शिवबंधन आहे. बाळासाहेबांच्या आठवणीत आम्ही हे शिवबंधन घालतो. आम्ही खरे शिवसैनिक असल्याचेही आ. केसरकर म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात सामील झाल्याने संपूर्ण राज्यालाच मदत होणार आहे. फडणवीस यांच्याकडे असलेली माहिती, त्यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेले प्रकल्प आता वेगात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती आ. केसरकर यांनी दिली.

Share