अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या निवडणुका सहा महिन्यांवर आलेल्या असतानाच पाटीदार समाजाचा मोठा पाठिंबा असलेले युवा नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. हार्दिक पटेल यांनी आज ट्वीट करून काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. राहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट असून, मी जेव्हा जेव्हा गुजरातच्या समस्या घेऊन राहुल गांधी यांना भेटलो तेव्हा तेव्हा पक्षाच्या नेतृत्त्वाला आमचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा मोबाईल पाहण्यातच जास्त रस असायचा, असा निशाणा हार्दिक पटेल यांनी राहुल गांधींवर साधला आहे.
हार्दिक पटेल यांनी तीन भाषांमध्ये आपला राजीनामा लिहून प्रसिद्ध केला. या माध्यमातून हार्दिक पटेल यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष असल्या तरी प्रत्यक्षात पक्षाचा कारभार हा राहुल गांधी यांच्याकडूनच चालवला जातो. हार्दिक पटेल यांच्या राजीनामापत्रातील तिसऱ्या परिच्छेदातील पहिली ओळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हार्दिक पटेल यांनी आपल्या राजीनामापत्रात राहुल गांधी यांच्याबाबत होत असलेल्या टीकेचा मुद्दा नव्याने उपस्थित केला आहे. राहुल गांधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा हा मुद्दा हार्दिक पटेल यांनी अधोरेखित केला आहे.
हार्दिक पटेल यांच्याकडून राहुल गांधींची छायाचित्रे ट्विट
तीन वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात आलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्ष आता विरोध करण्याच्या राजकारणापुरताच मर्यादित राहिल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्त्वात असलेला गंभीरतेचा अभाव हा एक मोठा मुद्दा आहे. संकटाच्या काळात पक्षाला नेतृत्त्वाची गरज असताना काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी परदेशात होते, अशी खंतही हार्दिक पटेल यांनी बोलून दाखवली आहे. हार्दिक पटेल यांनी आपले राजीनामा पत्र ट्विट करताना राहुल गांधी यांची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये राहुल गांधी सभा आणि कार्यक्रमांच्या व्यासपीठांवर नेत्यांच्या गराड्यात बसले असताना मोबाईल पाहताना दिसत आहेत.
राहुल गांधींमध्ये गांभीर्याचा अभाव
हार्दिक पटेल यांनी मोबाईलमध्ये रमलेल्या राहुल गांधींची जी छायाचित्रे ट्विट केली आहेत, त्यापैकी एक छायाचित्र युक्रेन संकटावेळी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीतील आहे. दुसरे छायाचित्र पुलवामातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेतील आहे. तेव्हाही राहुल गांधी मोबाईलमध्ये पाहत होते, तर तिसरे छायाचित्र हे संसेदत राष्ट्रपतींचे अभिभाषण सुरू असतानाचे आहे. तेव्हादेखील राहुल गांधी आपल्या मोबाईलमध्ये पाहत होते.
राहुल गांधी यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे. असाच काहीसा प्रकार आसामचे विद्यमान मुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते हेमंत बिस्व सरमा यांच्याबाबत घडला होता. हेमंत बिस्व सरमाही एकदा राहुल गांधी यांना भेटण्यासाठी गेले होते. तेव्हा सरमा हे राहुल गांधी यांच्यासमोर आपल्या समस्या पोटतिडकीने मांडत होते. मात्र, त्यावेळी राहुल गांधी आपल्या ‘पीडी’ या कुत्र्याला बिस्किटं भरवण्यात मग्न होते. त्यांनी सरमा यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. एवढेच नव्हे तर राहुल गांधी ज्या प्लेटमधून कुत्र्याला बिस्कीटं भरवत होते, त्याच प्लेटमधून उचलून काँग्रेसचे काही नेते बिस्कीट खात होते, असा दावाही सरमा यांनी केला होता. या प्रकारामुळे अपमानित झालेल्या हेमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता काँग्रेसची सत्ता आकुंचन पावून दोन राज्यांपुरतीच उरली आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे. गुजरातसह अनेक राज्य येत्या वर्षभरात विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहेत. अशावेळी हार्दिक पटेल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे काँग्रेसला पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे बोलले जाते.