राहुल गांधींचा नेपाळच्या नाईट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल;भाजप आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा नेपाळच्या नाईट क्लबमधला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यावरून विरोधकांना राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. राहुल गांधी यांच्या या व्हिडीओवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला  आहे. हा व्हिडीओ एका पार्टीमधला असून, त्यावरून भाजपने राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या या व्हिडीओत राहुल गांधी हे लॉर्डस् ऑफ ड्रिंक्स नावाच्या नाईट क्लबमध्ये एका महिलेसोबत दिसत असून, मागे कर्णकर्कश आवाज येत असल्याचे दिसत आहे. खासगी दौर्‍यावर नेपाळला जात असल्याचे अलिकडेच राहुल गांधी यांनी सांगितले होते. त्यानंतर हा व्हिडीओ समोर आला आहे.

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुट्टी, पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप, खासगी विदेश दौरा या गोष्टी आता देशाला नवीन राहिलेल्या नाहीत, असा टोमणा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मारला आहे. दुसरीकडे भाजप नेते कपिल मिश्रा यांनी राहुल गांधी कोणासोबत आहेत? ते चिनी एजंटसोबत आहेत काय? राहुल गांधी हे चीनच्या दबावाखाली सोशल मीडियावर संदेश देत असतात? हा त्यांच्या खासगी जीवनाचा मुद्दा नसून देशाचा मुद्दा आहे…आदी प्रश्न उपस्थित केले आहेत. पहचान कौन? असा उपरोधिक टोलाही मिश्रा यांनी मारला आहे.

भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले, राजस्थानमधील जोधपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. या राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी हे नेपाळमधल्या नाईट क्लबमध्ये मजा मारत आहेत. खरे तर त्यांना भारतातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी देशात असावयास हवे होते. काँग्रेस ही संपलेली पार्टी आहे. मात्र, राहुल गांधी यांची पार्टी चालूच राहील. राजकारणात ते गंभीर नाहीत. जेव्हा पक्षाला त्यांची गरज आहे, तेव्हा ते नेपाळमध्ये काय करीत आहेत, हे कोणाच्याही आकलनापलिकडे आहे. भाजपचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट करत राहुल गांधींचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. मुंबईवर जेव्हा दहशतवादी हल्ला झाला, तेव्हादेखील राहुल गांधी नाईट क्लबमध्ये होते, असे सांगत जेव्हा काँग्रेस संकटात असते, तेव्हा ते नाईट क्लबमध्ये असतात, असा टोला अमित मालवीय यांनी लगावला आहे.

राहुल गांधींची ‘ती’ मैत्रीण कोण? जिच्या लग्नासाठी ते नेपाळला गेले…
नेपाळी वृत्तपत्र ‘द काठमांडू पोस्ट’च्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी नेपाळमधील त्यांची मैत्रीण सुमनिमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला आले आहेत. सुमनिमाचे वडील भीम उदास यांनी सांगितले की, आम्ही राहुल गांधींना मुलीच्या लग्नात येण्याचे निमंत्रण दिले होते. मंगळवारी लग्नसोहळा होणार असून, ५ मे रोजी रिसेप्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भीम उदास हे नेपाळचे म्यानमारमध्ये राजदूत राहिले आहेत. त्यांची मुलगी सुमनिमा ही सीएनएनची माजी वार्ताहर आहे.

सुमनिमा उदास हिचा विवाह नीमा मार्टिन शेर्पासोबत होत आहे. सुमनिमाने अमेरिकेतील ली विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यास क्रम पूर्ण केला असून, ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. तिने पत्रकार म्हणून दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण कव्हर केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये सुमनिमा उदास हिने अमेरिकन जर्नालिस्ट ऑफ द इयरचा पुरस्कारही जिंकला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी सोमवारी काठमांडूला पोहोचले होते. त्यानंतर रात्री लग्नसोहळ्यापूर्वीच्या एका पार्टीत ते मैत्रिण सुमनिमासह सहभागी झाले. या पार्टीतील सहभागी झाल्याचा राहुल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये राहुल एका नाईट क्लबमध्ये काही लोकांसोबत पार्टी करत आहेत. त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असलेले लोक मद्य प्राशन करत आहेत. त्यानंतर भारताच्या राजकारणात एकच खळबळ माजली. भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे, तर काँग्रेसने राहुल गांधी यांचा बचाव करत भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधी नेपाळला खासगी लग्न सोहळ्यासाठी गेले होते -रणदीप सुरजेवाला
दरम्यान, या व्हिडीओबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, राहुल गांधी नेपाळ या मैत्रीपूर्ण देशात एका पत्रकार मित्राच्या खासगी लग्न सोहळ्यासाठी गेले होते. मला जेवढं माहीत आहे, तेवढ्यावरून तरी मित्र*मैत्रिणी, कुटुंब असणं, लग्नसोहळ्याला हजेरी लावणं हा आपल्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा भाग आहे. लग्नसोहळ्यात सहभागी होणं हा अजूनतरी गुन्हा ठरत नाहीये. कदाचित उद्यापासून भाजपा लग्न सोहळ्यात सहभागी होणं आणि मित्र-मैत्रिणी असणं हा गुन्हा ठरवेल; पण हे मला नक्की सांगा, जेणेकरून आम्ही मित्र-मैत्रिणींच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावण्याच्या सभ्यतेमध्ये आम्ही बदल करू.

याप्रसंगी रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान दौऱ्यावरून यावेळी निशाणा साधला. “राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे पाकिस्तानला नवाज शरीफ यांच्यासोबत केक कापण्यासाठी बिन बुलाए मेहमानसारखे गेले नव्हते.  त्यानंतर पठाणकोटला काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे”, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

Share