‘मन उडू उडू झालं’ मालिका मी सोडलेली नाही; हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘मन उडू उडू झालं’ या लोकप्रिय मालिकेत दिपूची भूमिका साकारत असलेली हृता दुर्गुळे हिने मालिकेच्या निर्मात्यांसोबत भांडण झाल्यामुळे मालिका सोडली असल्याचे म्हटले जात होते; परंतु या प्रकरणात आता ट्विस्ट आल्याचे दिसून येत आहे. ‘मी ही मालिका सोडली नाही, मी अजूनही मालिकेचे शूटिंग करतेय, असे हृता हिने म्हटले आहे.

‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे ही दिपूची आणि अभिनेता अजिंक्य राऊत हा इंद्राची मुख्य भूमिका साकारत आहेत. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत असून, सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. हृता दुर्गुळे आणि ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निर्मात्यांचे भांडण झाले होते. या मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसल्याने त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेल्यानंतर हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. तसेच हृता नाटकांच्या प्रयोगामुळे आणि ‘अनन्या’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड व्यस्त असल्यामुळे ती ही मालिका सोडत असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र, नुकतेच हृता हिने या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे.

हृता दुर्गुळेने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली, “मी ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडलेली नाही. या केवळ अफवा आहेत. सध्या मी या मालिकेचे शूटिंग करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी तसेच चाहत्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये”. स्वत: हृता दुर्गुळेने ही मालिका सोडली नसल्याचे स्पष्टीकरण दिल्यामुळे या सर्व अफवांवर आता पडदा पडला आहे.

https://www.instagram.com/p/Cci5Y9DtgZs/?utm_source=ig_web_copy_link

अल्पावधीतच अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने मालिकाविश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतील तिच्या कामाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. तसेच रंगभूमीवर तिची प्रमुख भूमिका असलेले ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे नाटकही तुफान गाजत आहे. लवकरच तिचा पहिलावहिला ‘अनन्या’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Share