राज ठाकरेंवर गुन्हा दाखल होताच प्रवीण दरेकरांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने ठाकरे सरकारचा जळफळाट झाला आहे. तोच राग आता सरकार बाहेर काढत आहे. त्यामुळेच पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील उद्धव ठाकरे सरकार आपल्या अधिकारांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करत आहे, अशी टीका भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी (१ मे) औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न काढल्यास ४ मेनंतर मशिदीसमोर भोंगे लावून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा दिला होता. मनसेच्या औरंगाबादेतील सभेत पोलिसांनी त्यांना १६ अटींचे पालन करण्याविषयी बजावले होते. त्यातील १२ अटींचे उल्लंघन केल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलिसांनी आज ३ मे रोजी राज ठाकरेंविरोधात कारवाई केली आहे. राज ठाकरे यांच्यावर कलम ११६, ११७, १५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना
ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

यावेळी यावेळी प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरे यांचे समर्थन करत ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून सरकार मनसैनिकांना संदेश देऊ पाहत आहे. आमच्याविरोधात बोललात तर कायद्याचा वापर करून तुम्हाला पूर्णपणे दाबू, असे सरकार सुचवू पाहत आहे. राज ठाकरे हे कोणाच्या सांगण्यावरून नाही तर त्यांची ती स्वत:ची भूमिका आहे आणि ते स्वत:ची भूमिका ठामपणे मांडतात. देशात लोकशाही असतानादेखील स्वत:चे मत मांडणे येथे गुन्हा ठरवला जात आहे. महाराष्ट्रात पश्चिम बंगालचा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला जात असून, राणा दाम्पत्य आणि राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करून राज्य सरकार मुस्कटदाबी करत आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

सरकारने एखादे आंदोलन चिरडायचे ठरवले तर काय होऊ शकते, याचे उदाहरण म्हणून मी मनसेकडे पाहत आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकतील, अश मनसेच्या नेत्यांना जेरबंद केले जात आहे. तुमच्या पक्षाच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, यामधून बाकीच्यांनी बोध घ्या, हे सरकारकडून अधोरेखित करण्याचा प्रयत्न होत आहे. मनसेचे मशिदींवरील भोंग्यांबाबतचे आंदोलन चिरडण्यासाठी दबाव आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही दरेकर यावेळी म्हणाले.

राज्य सरकारलाच शांतता नको आहे. अशाप्रकारे धरपकड, नोटीस किंवा अटक करून हिटलरशाही पद्धतीने शांतता राखता येईल, असा सरकारचा समज आहे का? पण राज्य सरकार हिंदुत्वाची चळवळ जितकी दडपण्याचा प्रयत्न करेल, तितकी ती उसळी मारून वर येईल, असेही दरेकर यांनी म्हटले.

भाजप भोंग्यांविषयीच्या भूमिकेवर ठाम
आम्ही चार पावले पुढे टाकण्यासाठी एक पाऊल मागे घेतोय. सत्ताधाऱ्यांना राज्यात शांतता हवी की, दंगल हे त्यांनी ठरवावे. भाजपची भोंग्यांविषयीची भूमिका आजही तीच आहे. यूपीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले त्यावेळी सर्व स्तरावरून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी याला पाठिंबा दिला. त्यामुळे भोंगे उतरवण्याची आमची भूमिका आजही ठाम असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

 

राज्य सरकारकडून एकप्रकारे अघोषित आणीबाणी

यावेळी दरेकर यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले. मनसेच्या आंदोलनाआडून घातपात करण्यासाठी परराज्यातून लोक आल्याचा दावा संजय राऊत करतात; पण त्यांना निराधार आणि बेजबाबदारपणे बोलण्याची सवय आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेरून राज्यात लोक येत असतील तर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. मात्र, मनसेच्या नेत्यांना नोटीस पाठवून आणि गुन्हे दाखल करून राज्य सरकारकडून एकप्रकारे अघोषित आणीबाणी लादण्यात आली आहे, असेही दरेकर म्हणाले.

Share