राज्यात पावसाचा जोर वाढणार; येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भात अतिमुसळधार पाऊस

पुणे : राज्यात मान्सूनचा प्रवास काहीसा मंदावला असल्यामुळे अजूनही पावसाला म्हणावी अशी सुरुवात झालेली नाही. मात्र, आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी एक ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकणात सोमवारपासून अति-मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मुंबईसह ठाणे आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

हवामान खात्याने आज गडचिरोली वगळता सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली नांदेड या जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार आहेत. विदर्भातील गडचिरोली वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे. पुढील पाच दिवस कमी-जास्त प्रमाणात हीच स्थिती राहणार आहे.

वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की, १८ जूनपासून अर्थात आजपासूनच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आणि दक्षिण कोकणात सोमवारपासून अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये
यंदा तीन दिवस आधीच केरळात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला होता. गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर काही दिवस मान्सूनचा खोळंबा झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. अजूनही मराठवाडा, विदर्भातील काही भागात मान्सून दाखल झाला नाही. मान्सूनच्या पावसावर राज्यातील शेतकरी अवलंबून असतो. पाऊस झाला की, शेतकरी पेरणी करतात. मात्र, अजूनही आवश्यक तितक्या प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी अजूनही पेरणी करण्यासाठी पावसाची वाट पाहात आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांनी १०० से.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

Share