आषाढी वारी : उद्या तुकोबांच्या, तर मंगळवारी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरलाप्रस्थान

पुणे : दोन वर्षांच्या खंडानंतर यावर्षी प्रथमच आषाढी वारी आणि पालखीचा सोहळा रंगणार असल्याने वारकऱ्यांमध्ये त्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या २० जूनला श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. त्यानंतर २१ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी नगरी पुन्हा सज्ज झाली आहे. संत तुकोबा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने आळंदी-देहू नगरीत दाखल होत आहेत.

कोरोना महामारी आणि निर्बंधामुळे मागील दोन वर्षांत पायी आषाढी वारी आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. सलग दोन वर्षे संतांच्या पालख्या आषाढी एकादशीला एसटी बसने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरला नेण्यात आल्या. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरला नेण्यापूर्वी आळंदी आणि देहू येथे प्रस्थान सोहळा झाला. मात्र, त्याला ठराविकच वारकऱ्यांची उपस्थिती होती. यंदा मात्र पादुका प्रस्थान, पालखी सोहळा आणी पंढरीची पायी वारी लाखो वैष्णवांच्या साक्षीने होणार आहे. त्या अनुषंगाने देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थान आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे.

उद्या २० जून रोजी देहू येथून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तर २१ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होण्यासाठी खांद्यावर भागवत धर्माची पताका आणि डोईवर तुळशी वृंदावन घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या सध्या आळंदी आणि देहूच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत. टाळ-मृदंगाचा आणि मुखाने हरिनामाचा गजर करीत हजारोच्या संख्येने दररोज वारकरी आळंदी आणि देहू परिसरात दाखल होत आहेत. देहू आणि आळंदीसह आजूबाजूच्या परिसरात वारकऱ्यांच्या राहुट्या उभ्या राहत आहेत. या परिसरातील धर्मशाळा वारकऱ्यांच्या गर्दीने गजबजल्या आहेत. त्यामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय बनले आहे. प्रशासनाच्या वतीने देहू येथे इंद्रायणी नदीच्या काठावर स्वच्छता करण्यात आली असून, घाटावर वारकऱ्यांच्या स्नानासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीने प्रस्थान सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे.

आळंदीतून उद्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघणार
मंगळवार, दि.२१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. रात्री आळंदीतच आजोळघरी दर्शनबारी मंडपात पालखी मुक्कामी राहील. बुधवार, दि.२२ जून रोजी सकाळी आळंदीतून मार्गस्थ होईल व सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील. २३ जून रोजी देखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील. शुक्रवार, दि.२४ जून व शनिवार, दि.२५ जून रोजी सासवड येथे दोन दिवस पालखी मुक्कामी राहील. त्यानंतर रविवार, दि.२६ जून रोजी जेजुरी, सोमवार,दि.२७ जून रोजी वाल्हे, मंगळवार, दि.२८ जून व बुधवार,दि.२९ जून रोजी लोणंद येथे दोन दिवस पालखी मुक्कामी राहील. त्यानंतर गुरुवार, दि.३० जून रोजी तरडगाव, शुक्रवार, दि.१ जुलै व शनिवार, दि.२ जुलै रोजी फलटण येथे पालखीचा दोन दिवस मुक्काम राहील. रविवार, दि.३ जुलै रोजी बरड, सोमवार, दि.४ जुलै रोजी नातेपुते, मंगळवार, दि.५ जुलै रोजी माळशिरस, बुधवार, दि.६ जुलै रोजी वेळापूर, गुरुवार, दि. ७ जुलै रोजी भंडीशेगाव, शुक्रवार, दि.८ जुलै रोजी वाखरी तर शनिवार, दि.९ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर मुक्कामी पालखी सोहळा पोहोचेल. रविवार, दि.१० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे.

पुण्यात २२ जूनला संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर यंदा पहिल्यांदाच पालखी सोहळा होणार असल्याने हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू येथून २० जून रोजी तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी येथून २१ जून रोजी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर दोन्ही पालख्यांचे २२ जून रोजी सायंकाळी पुणे शहरात आगमन होणार आहे. २३ जून रोजी पालखीचा शहरात मुक्कामी असेल, तर २४ जून रोजी पालखी सोहळा पुढे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

पालखी सोहळ्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त
पुणे पोलिसांकडून या पालखी सोहळ्यासाठी बंदोबस्ताचे खास नियोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यासाठी पुणे शहरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विशेष शाखेकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यात साध्या वेशातील पोलिसांसह गुन्हे शाखेची पथकेही बंदोबस्तात राहणार आहेत. राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी तसेच गृहरक्षक दलाचे ६०० जवान त्याचबरोबर स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारीदेखील बंदोबस्तात असणार आहेत.

पंढरपूरसाठी गावागावातून एसटी बससेवा
कोरोनाच्या सावटामुळे गेली दोन वर्ष पायी वारी झाली नाही. त्यामुळे यावर्षी वारकऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. आषाढी वारीसाठी भाविकांना थेट घरापासून पंढरपूरला जाण्याची सुविधा एसटी महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. गावातील वारकऱ्यांनी एकत्रितपणे बसचे बुकिंग केल्यास त्यांना गावातूनच बससेवा मिळणार आहे. यासाठी ४० व्यक्तींची संख्या आवश्यक असून, ही बस ६ ते १४ जुलै या कालावधीत ५३० बसेस सोडण्यात येणार आहेत. लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणावरे यांनी दिली. यावर्षी सासवड ते पुणे या मार्गावरील प्रवासासाठी १५० बसेस वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवासाचा प्रश्न सुटणार आहे. याआधी झालेल्या वारीच्या कालावधीत ११० एसटी बसेस होत्या. मात्र, यावर्षी ४० बसेस वाढवण्यात आल्या आहेत.

Share