राज ठाकरे स्वतःला बाळासाहेब ठाकरेच समजू लागले आहेत! उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : हिंदुत्व, मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांचे चुलत बंधू मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. “राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असे समजू लागले आहेत. तसेच राज ठाकरे हे भाजपची ‘बी’ टीम नव्हे तर ‘ढ’ टीम आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (२९ एप्रिल) रात्री शिवसेना खासदारांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. शिवसंपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील अनुभव त्यांनी ऐकून घेतले आणि पुढील टप्प्यासाठी सूचना केल्या.
याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले, राज ठाकरे हे भाजपची ‘बी’ टीम नव्हे तर ‘ढ’ टीम आहे. ‘मुन्नाभाई’ चित्रपटात मुन्नाभाईला गांधीजी वाचून वाचून आपणच गांधींसारखे बोलू शकतो, असा भ्रम होतो. तसेच राज ठाकरे हे आपण जणू बाळासाहेब ठाकरेच आहोत, असे समजू लागले आहेत. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर व्हावे यासाठी शिवसेनेने आंदोलन सुरू केले. त्यावेळी मनसे काय करत होती, बाबरी मशीद प्रकरणावेळी राज ठाकरे कुठे होते, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

विरोधकांना जशास तसे उत्तर द्या
महाविकास आघाडी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा आणि विरोधकांना जशास तसे उत्तर द्या. मनसे हा पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधलेला आहे. त्यांचे बेगडी रूप लोकांना दाखवून द्या, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिली.

पक्षसंघटना अधिक बळकट करा
मराठवाडा हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्या ठिकाणी येत असलेली राजकीय आव्हाने आणि बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन पक्षसंघटना अधिक बळकट करण्याची गरज आहे. पश्चिम विदर्भातही पक्षसंघटना बळकट करण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा २६ ते २९ मे या काळात राबवण्यात येणार असून, त्या काळात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात लोकांपर्यंत जायचे आहे. या ठिकाणीही सरकारच्या कामांचा उपयोग पक्षवाढीसाठी करायचा आहे, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रवक्त्यांच्या बैठकीत भाजप व मनसेच्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा समाचार घेतला. तसेच या दोन्ही पक्षांना आक्रमकपणे उत्तर देण्याचा पक्ष प्रवक्त्यांना आदेश दिला.

Share