नऊ महिन्यांनंतरच घेता येणार बूस्टर डोस!

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून बूस्टर डोससाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेत कुठलाही बदल करण्‍यात आलेला नाही. बूस्टर डोससाठी नऊ महिन्यांचीच मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच दुसऱ्या आणि बूस्टर डोस दरम्यानचे अंतर कमी करून सहा महिन्यांवर आणण्याची शक्यता वर्तवली जात होती; परंतु केंद्र सरकारचा त्यात कुठलाही बदल करण्याचा विचार नसल्याची माहिती समोर आली आहे.

आयसीएमआर तसेच इतर आंतरराष्ट्रीय शोध संस्थांच्या रिसर्चनुसार लसीच्या दोन डोसच्या प्राथमिक लसीकरणानंतर जवळपास सहा महिन्यांनी शरीरात अँटीबॉडीचा स्तर कमी होतो. बूस्टर डोस दिल्याने कोरोना संसर्गाविरोधात रोगप्रतिरोधक क्षमता वाढते. अशात दुसऱ्या आणि बूस्टर डोस दरम्यानचे अंतर नऊ महिन्यांवरून सहा महिन्यांवर आणण्याची शिफारस राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूहाकडून (एनटीएजीआय) केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, बूस्टर डोससाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेत कुठलाही बदल न करता बूस्टर डोससाठी नऊ महिन्यांचीच मर्यादा कायम ठेवण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

१८ वर्षांहून अधिक वयोगटातील सर्वच बूस्टर डोससाठी पात्र
नऊ महिन्यांपूर्वी दुसरा डोस ज्यांनी घेतला आहे अशा १८ वर्षांहून अधिक वयोगटातील नागरिक खबरदारी म्हणून बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. देशात १० जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी तसेच कोरोनाविरोधातील युद्धात आघाडीवर असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्सला बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून ६० वर्षांहून अधिक वयोगटातील सर्वांनाच बूस्टर डोस घेण्यात पात्र ठरवण्यात आले.

Share