राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येत्या ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्या दौऱ्यादरम्यान शरयू नदीकाठी राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. त्यावेळी मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, त्या दृष्टीने पक्ष पातळीवर जोरदार तयारी करण्यात येत आहे.

सध्या भोंगा आणि हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवली जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. तत्पूर्वी, १ मे रोजी राज यांची औरंगाबाद येथे जाहीर सभा होणार असून, या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आधी मराठीचा अजेंडा हाती घेतलेले राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्वार झाले आहेत. त्या दृष्टीने त्यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

अयोध्या दौऱ्याच्या नियोजनासाठी राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या नेत्यांची विशेष बैठक बुधवारी पक्षाच्या मुख्यालयात राजगड येथे पार पडली. या बैठकीस मनसेचे प्रमुख नेत्यांसह मुंबईतील जवळपास ३६ विभाग अध्यक्ष उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून, त्यासाठी जास्तीत जास्त लोक अयोध्येत नेण्यासाठी विभाग अध्यक्षांना बैठकीत सूचना देण्यात आल्या. मुंबईतील प्रत्येक विभाग अध्यक्षांना रेल्वेची एक बोगी भरण्याचे लक्ष्य देण्यात आल्याचे कळते.

राज ठाकरे ५ जूनला अयोध्येत जाणार आहेत; पण मनसे कार्यकर्ते त्याअगोदरच २ व ३ जूनपासून अयोध्येला रवाना होणार आहेत. या दौऱ्यासाठी मनसेने १० ते १२ रेल्वेगाड्यांची मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. प्रत्येक विभाग अध्यक्षांना किमान एक बोगी भरण्याची सूचना करण्यात आली आहे. मुंबईप्रमाणे ठाणे, नाशिक आणि पुण्यासह इतर जिल्ह्यांतील विभाग अध्यक्षांना या स्वरूपाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यानुसार या जिल्ह्यातील विभाग अध्यक्षांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे समजते.

Share