राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही; भाजप खासदाराचा इशारा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्याला भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभांमधून अनेक वेळा उत्तर भारतीयांचा अवमान केला आहे. त्यांनी अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि नंतरच अयोध्येत पाऊल ठेवावे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी उघड धमकीच ब्रिजभूषण शरण सिंग यांनी दिली आहे.

मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा, हिंदुत्व अशा मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाची भूमिका स्वीकारल्यानंतर त्यांनी तीन जाहीर सभा घेतल्या. गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत शिवतीर्थावरील सभेत त्यांनी रणशिंग फुकले. पुढे ठाण्यात झालेल्या ‘उत्तर’ सभेत आणि औरंगाबादेत १ मे रोजी झालेल्या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेत हिंदुत्ववादाची भूमिकेला आणखी धार लावली. तत्पूर्वी, पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी येत्या ५ जून रोजी आपण शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या याच दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी विरोध केला आहे.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करताना ब्रिजभूषण यांनी म्हटले आहे की, ”राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीय लोकांची माफी मागत नाहीत तोपर्यंत मी त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी सल्ला देऊ शकत नाही; पण लोकांच्या भावना लक्षात घेता मी त्यांना विनंती केली आहे की, जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटू नका.”

Share