१२ दिवसांनंतर भेट; रवी राणांना पाहताच नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला!

मुंबई : राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला काल (बुधवार) मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज (गुरुवार) दोघांचीही तुरुंगातून सुटका झाली. खासदार नवनीत राणा यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचे पती आमदार रवी राणा तुरुंगातून बाहेर येताच थेट लीलावती रुग्णालयात पोहोचले. तब्बल १२ दिवसांनी राणा पती-पत्नीची भेट झाली. यावेळी रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना जवळ घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत राणा दाम्पत्याने ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला चिथावणीखोर वक्तव्य करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली खा.नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने अखेर बारा दिवसांनी त्यांना जामीन मंजूर केला.

खा. नवनीत राणा यांना मणक्यासंबंधित त्रास असल्याने त्या वारंवार रुग्णालयात जाण्यासाठी तुरूंग प्रशासनाकडे विनंती करत होत्या. त्यानंतर काल भायखळा तुरुंग प्रशासनाने त्यांना जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; पण त्यानंतर रात्री त्यांना पुन्हा भायखळा तुरुंगात नेले होते. जामीन मिळाल्यानंतर आज सकाळी तुरुंगातून सुटका होताच, नवनीत राणा लीलावती रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांना या ठिकाणी दाखल करून घेण्यात आले. आज दुपारपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी अटक केल्यानंतर आ. रवी राणा यांना तळोजा तुरुंगात तर खा. नवनीत राणा यांना भायखळा येथील महिला तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेव्हापासून राणा दाम्पत्याची भेट झाली नव्हती. कोर्टात सुनावणीच्या वेळी काही क्षण दोघांची भेट झाली होती. खा. नवनीत राणा यांच्या सुटकेनंतर तब्बल ५ ते ६ तासांनी आ. रवी राणा यांची तळोजा तुरुंगातून सुटका झाली. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ते तळोजा तुरुंगातून बाहेर आले. तिथून ते तडक लीलावती रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात गेल्यानंतर त्यांनी नवनीत राणा यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरकडूनही त्यांनी माहितीही घेतली. यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या देखील त्यांच्यासोबत होते. तत्पूर्वी रवी राणा यांना पाहताच नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्या धाय मोकलून रडायला लागल्या. रवी राणा यांनी नवनीत राणा यांना जवळ घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा केली. तुझ्याबरोबरच आहे, कुठेही जात नाही, असा धीरही दिला.

https://twitter.com/Adhav_Akshay1/status/1522205920435970049?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522205920435970049%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fbjp-leader-kirit-somaiya-go-to-lilavati-hospital-to-meet-navneet-rana%2Farticleshow%2F91343061.cms

राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. संबंधित विषयावरून माध्यमांशी संवाद साधू नये, अशी अट न्यायालयाने घातली आहे. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आ. रवी राणा माध्यमांशी काहीही बोलले नाहीत. यावेळी रवी राणा यांच्या हातात हनुमान चालिसाचे छोते पुस्तक होते.

Share