राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा, ‘राज’कारण तापलं

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत ०१ मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, यावरून आता राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राज ठाकरेंच्या सभेला अनेक स्तरातून तीव्र विरोध होताना दिसत आहे.

राज ठाकरे यांची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी दिला आहे. इतकंच नाहीतर प्रशासनाने परवानगी दिली तरी आम्ही सभा उधळून लावू, असा इशारा देखील कांबळे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘सध्या सर्व जाती-धर्माचे सन उत्सव सुरू आहेत. शांतता व सद्भावना कायम ठेवून सर्व धर्मियांनी सन उत्सव साजरे केले आहेत. अशी परिस्थिती असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे जाणीपुर्वक विशिष्ट एका धर्माला प्रार्थनेला विरोध करून जातीवरून तणाव निर्माण होईल असे प्रक्षोभक भाष्य वारंवार करून दोन समाजात तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा संविधानिक मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल’ असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.

Share