भाजपच्या पोलखोल अभियानातील गाडीची तोडफोड; शिवसेनेवर आरोप

मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पोलखोल अभियान सुरू केले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या गाडीची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचा प्रकार चेंबूरमध्ये समोर आला आहे. दगडफेक करून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान, या घटनेचा भाजप नेत्यांनी तीव्र निषेध केला आहे. ही तोडफोड शिवसेनेने केल्याचा आरोप भाजपने केला आहे. आम्ही दंडेलशाहीला दंडेलशाहीने उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत चेंबूरमध्ये आज भाजपच्या पोलखोल अभियानाचा शुभारंभ होणार आहे; परंतु त्यापूर्वीच या अभियानासाठी तयार केलेल्या गाडीवर अज्ञात लोकांनी दगड मारत तोडफोड केली आहे. महाविकास आघाडी सरकारचे आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी आम्ही पोलखोल अभियान राबवित आहोत. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अस्वस्थ झाले आहे. भ्रष्टाचार उघड होऊ नये म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले आहे, असा आरोप या कार्यक्रमाचे आयोजक राजेश शिरवाडकर यांनी केला आहे.

…तर सरकार जबाबदार असेल -प्रवीण दरेकर

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, भाजपने मुंबईत सुरू केलेल्या पोलखोल अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. या अभियानाचा समारोप सायन येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या अभियानातून मुंबई महापालिकेत होत असलेला घोटाळा आम्ही उघड करत आहोत. मुंबई महापालिकेत ३ लाख कोटी रुपयांच्या आसपास भ्रष्टाचार झाला आहे. लोकशाही पद्धतीने आम्ही लोकांसमोर तुमच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत आहोत; पण काही गुंड प्रवृत्तींना हाताशी धरून आमचे हे पोलखोल आंदोलन दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. यामागे शिवसेनेचा हात आहे की काय हे पाहण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील आरोपीला त्वरित पकडले नाही तर पोलिस स्टेशनला येऊन आंदोलन करणार असून, पोलखोल आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार असेल, असेही दरेकर म्हणाले.

शिवसेनाच पाठीत खंजीर खुपसू शकते -आ. प्रसाद लाड
संजय राऊत म्हणतात, आम्ही पाठीवर वार करत नाही. आता हेच लोक रात्रीच्या काळोखात हल्ला करताहेत. तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणूनच ही तोडफोड केली आहे. तत्काळ आरोपीला अटक केली नाही तर आम्ही पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करू. पाठीत खंजीर खुपसण्याचे काम शिवसेनाच करू शकते, असा आरोप आ. प्रसाद लाड यांनी केला आहे.

Share