‘शाहू छत्रपती’  चित्रपटातून राजर्षी शाहू महाराजांचे जीवनकार्य आता मोठ्या पडद्यावर

मुंबई : राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य तब्बल सतरा भाषांमध्ये साहित्याच्या रूपाने जागतिक पातळीवर पोहोचल्यानंतर आता सहा भाषांमधील चित्रपटांच्या माध्यमातून त्यांचे विचार पोहोचविण्यात येणार आहेत. लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित ‘शाहू छत्रपती’ या भव्य मराठी चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर ‘शाहू छत्रपती’ या सिनेमाची घोषणा केली आहे. सुप्रसिद्ध लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाची कथा लिहिली आहे, तर स्वतः जितेंद्र आव्हाड या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. जितेंद्र आव्हाड हे या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पर्दापण करत आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे काम दीपस्तंभासारखे आहे. केवळ अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे दीनदलितांचे कैवारी, लोकराजा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेले कार्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे म्हणून अनेक भाषेत त्यांचे चरित्र अनुवादित करण्यात आले. इंग्रजी, रशियन, जर्मनी याबरोबरच कन्नड, तेलगू, गुजराती अशा अनेक भाषेत त्यांचे चरित्र उपलब्ध आहे. आता त्यांचे विचार व कार्य चित्रपटाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी, तामिळ व तेलगू या सहा भाषांमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यावर चित्रपट काढण्यात येणार आहे.

ब्रिटीश राजसत्तेच्या काळात रयतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी लढणारे, सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचा गौरवशाली इतिहास या भव्य चरित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसोबत इतर भाषांमध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जितेंद्र आव्हाड प्रस्तुतकर्ता असलेल्या ‘शाहू छत्रपती’ चित्रपटाची कथा ज्येष्ठ लेखक आणि इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधन कार्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक वरुण सुखराज करणार आहेत. विद्रोह फिल्म्स या चित्रनिर्मिती संस्थेतर्फे या भव्य चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ होणार आहे. राजर्षी शाहू महाराजांची भूमिका कोण करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

कोल्हापूर येथील न्यू पॅलेस येथे ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आव्हाड म्हणाले, थोर महापुरुषांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगातून अनमोल विचार समाजाला मिळतात. महापुरुषांचे आचार आणि विचार भावी पिढीसाठी मार्गदर्शक असल्याने या विचारांचा प्रचार आणि प्रसार होणे तितकेच महत्वाचे आहे. शाहू महाराजांचे विचार अनेक इतिहास संशोधकांनी त्यांच्या ग्रंथातून मांडले आहेत. आता हे विचार ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाच्या माध्यमातून जगभर पोहोचतील. यावेळी डॉ. विनय काटे व वरुण सुखराज यांनीही मनोगत व्यक्त केले.

‘शाहू छत्रपती’ हा चित्रपट मराठीसह तब्बल सहा भाषांमध्ये रिलीज केला जाणार असून, मोठ्या पडद्यावर हा सिनेमा २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, एक स्वप्न साकार होत आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करून सिनेमाच्या रुपात घेऊन येत आहोत, लोकराजाची कथा. ”शाहू छत्रपती”. सहा भाषांमध्ये भव्य स्वरुपात मोठ्या पडद्यालवर २०२३ मध्ये”. सोशल मीडियावर अनेकांनी जितेंद्र आव्हाड यांच्या या चित्रपटाचे स्वागत करताना अनेक चांगल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे. अलीकडच्या काही काळात मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. गेल्या काही दिवसांत ‘पावनखिंड’, ‘हंबीरराव’ असे अनेक ऐतिहासिक चित्रपट बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचे स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित ‘शाहू छत्रपती’ हा भव्य मराठी चित्रपट तयार करण्यात येणार आहे. आता ‘शाहू छत्रपती’ सिनेमाची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली आहे.

Share