अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड वारीमध्ये सहभागी; हरिनामाच्या गजरात धरला ठेका

पुणे : ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही नुकतीच आषाढी वारीत सहभागी झाली. ‘भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल’ असे म्हणत प्राजक्ताने पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांबरोबर पायी वारी करत टाळ-मृदंगांच्या आणि हरिभजनाच्या गजरात ठेका धरला. वारीत सहभागी झाल्यानंतर प्राजक्ताने तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.

एकीकडे महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारण चांगलेच तापले आहे, तर दुसरीकडे आषाढी वारी सुरू झाली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत एकनाथ, मुक्ताबाई, संत सोपानदेव आदी संतांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यात पंढरपूरची वारी होणार आहे. दोन वर्षानंतर पायी वारीमध्ये सहभागी होता आल्यामुळे वारकरी आणि भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. भक्तांच्या मांदियाळीत वारीसह पंढरपूर गजबजून गेले आहे. हरिनामाच्या गजरात अनेक भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. सराव वारकऱ्यांना विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.

https://www.instagram.com/reel/CfLnVULL_bC/?utm_source=ig_web_copy_link

पंढरीची वारी सुरू झाल्यापासून रोजचा पायी प्रवास, टाळ-मृदंगांचा अखंड नाद, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा घोष अन् अभंगाच्या सुरावटीत दंग होणारे मन…. असे भक्तिमय वतावर सध्या दिसत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांसह इतर संतांच्या पालख्यासोबत पंढरीच्या वाटेवर चालत असलेले लाखो वारकरी श्री विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हीदेखील पुण्यात पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी झाली होती. वारीत सहभागी होऊन तिने तुळशी वृंदावन डोक्यावर घेत विठूमाऊलीचा गजर केला. इतकेच नाही तर टाळ- मृदंगाच्या गजरात हरिनामाचा गजर केला. पारंपरिक भजनांवर ठेकाही धरला. दोन वर्षांनंतर वारीचा पुरेपूर आनंद लुटताना प्राजक्ता दिसली.

https://www.instagram.com/p/CfLR32rqpI6/?utm_source=ig_web_copy_link

प्राजक्ता गायकवाड हिने वारीतील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘वारीच्या वाटेवर या फोटोला कॅप्शनची गरज नाही. आतापर्यंतचा सगळ्यात भारी फोटो’, असे कॅप्शन देत प्राजक्ता गायकवाडने तिचे वारीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले पालखी सोहळ्यातील फोटो खूपच व्हायरल होत आहेत.

वारीत सहभागी होताना प्राजक्ताने पारंपरिक वेश परिधान केला होता. जांभळ्या रंगाची इरकल साडी, कपाळी काळा गंध आणि नारंगी टिळा लावलेल्या प्राजक्ताचा मराठमोळा लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. प्राजक्ताच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने म्हटले आहे, ‘रखुमाईसारख्या दिसता. खरंच आतापर्यंतच्या आवडलेल्या फोटोंपैकी एक हा फोटो आहे’. तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले आहे, ‘खूप छान दिसताय ताईसाहेब’. प्राजक्ताच्या चाहत्यांसाठी तिची प्रत्येक पोस्ट खास असते.

 

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत विविध कार्यक्रमांना भेट देत असते. सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये प्राजक्ता फार प्रसिद्ध आहे. प्राजक्ता सध्या टेलिव्हिजनवर कुठेही दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकतीच प्राजक्ताने इंजिनीअरिंगची परीक्षा दिली आहे.

Share