पाकिस्तानातील `इम्रानशाही` अखेर खालसा; पुन्हा येणार ‘शरीफ’राज

इस्लामाबाद : पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या खेळात अखेर पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली असून, पाकिस्तानी संसदेत विरोधकांनी इम्रान खान यांच्याविरुद्ध मांडलेला अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे अविश्वास ठरावाद्वारे पदावरून हटवण्यात येणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. दरम्यान, इम्रान खान यांच्या गच्छंतीनंतर पाकिस्तानी संसदेतील विरोधी पक्षनेते आणि ते पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत.

पाकिस्तानात आजवर कोणत्याही सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. आता इम्रान खान यांनाही मोठ्या राजकीय नाट्यानंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. गेल्या आठवड्यात इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष कासीम सुरी यांनी इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव फेटाळून लावला होता. मात्र, हे प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कासीम सुरी यांचा निर्णय रद्दबातल ठरवत अविश्वास ठरावाची वाट मोकळी करून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाकिस्तानच्या संसदेत शनिवारी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला.

मध्यरात्री उशिरा या ठरावावर मतदान घेण्यात आले. मतदानाआधी सभापती आणि उपसभापतींनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. १७४ संसद सदस्यांनी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर विरोधात शून्य मते मिळाली. हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येत असल्याचे पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी जाहीर केले. इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आल्यामुळे इम्रान खान यांना पंतप्रधानपद सोडावे लागले आहे.


इम्रान खान यांना पदच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ आवश्यक होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ च्या मित्रपक्षांचाही पाठिंबा मिळाला. विशेष म्हणजे अविश्वास ठरावावरील मतदानासाठी घेण्यात आलेल्या अधिवेशनापासून इम्रान खान दूरच राहिले. ते अखेरपर्यंत सभागृहात आले नाहीत. ‘अखेरच्या चेंडूपर्यंत खेळणार’ असा दावा करणाऱ्या इम्रान यांनी अग्निपरीक्षा न देताच पळ काढला. इम्रान खान स्वत: अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी गैरहजर होते. अविश्वास ठराव मंजूर होण्याआधीच इम्रान खान यांनी संसदेतील पंतप्रधानांसाठी असलेली जागा सोडलेली होती. त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाच्या खासदारांनी ऐन मतदानाच्या वेळी सभात्याग केला. त्यामुळे एकूण ३४२ सदस्यांच्या संसदेमध्ये १७४ मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.

इम्रान खान यांची खुर्ची गेल्यानंतर इम्रान यांनी सरकारी निवासस्थान सोडल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानातील सत्तेचा हा ड्रामा अजून रंगण्याची चिन्हे असून, नवे सरकार सत्तेत येत असताना इम्रान यांच्या अडचणीही वाढणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. इम्रान खान यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी प्रमुख ठिकाणी बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. संसदेच्या बाहेर कैद्यांसाठीची व्हॅन तैनात ठेवण्यात आली आहे.

Share