मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी ४२ आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोठी विधान केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीच्या हाॅटेलमध्ये असणारे २१ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले की, ठाकरे वर्षा बंगल्यावर येतील. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात जे राजकीय संकट सुरू आहे. त्यात मुंबईतून कोण कुठे जातंय या बातम्या दिला जात आहेत. त्यादरम्यान, शिवसेनेचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख इथे उपस्थित आहेत. त्यातील एक सूरतवरून आले आहेत. तर दुसरे गुवाहाटीवरून आले आहेत. त्यांना तिथून येताना त्यांना जो संघर्ष करावा लागला ती कहाणी थरारक आणि रोमांचक आहे. भाजपाने शिवसेनेच्या आमदारांना अपहरण करून फसवून नेलंय आणि त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी त्याबाबत उद्धव ठाकरेंशी वारंवार बोललो आहे. त्यांनी आता राज्यात आणि देशात किती वाईट राजकारण सुरू आहे, हे सांगावं, असे संजय राऊत म्हणाले.
त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावाही केला. ते म्हणाले की, मी इथे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे. कुणी कितीही फोटो व्हिडीओ पाठवावेत. मात्र ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा त्यातील २१ आमदार हे शिवसेनेचे असतील या आमदारांशी उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला आहे. तसेच जर विधानसभेत हा संघर्ष आला तर तिथेही महाविकास आघाडीचा विजय होईल, इतका आम्हाला विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.