राणाजी आणि पाठकबाई लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार

मुंबई : छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील सर्वांचे लाडके राणादा म्हणजे हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजे अक्षया देवधर यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. त्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर झाले होते. हे फोटो पाहून चाहते खूप खूश झाले. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचे लग्न कधी आणि कुठे होणार? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता; पण आता या दोघांच्या लग्नाबाबतची बातमी समोर आली आहे.

‘झी मराठी’ या वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांनी नुकतीच हजेरी लावली. यावेळी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी निलेश साबळे यांच्यासोबत मस्त गप्पा मारल्या. यावेळी हार्दिक जोशीला लग्न कुठे करणार, असे विचारले असता हार्दिक म्हणाला, आम्ही अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानीशी चर्चा केली. नुकतेच त्यांनी पुण्यामध्ये लग्न केले. आम्हीही पुण्यातच लग्न करण्याचे ठरवत आहोत.’ हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा साखरपुडा मे महिन्यात वाजतगाजत कोल्हापूरमध्ये झाला होता. त्यामागे काही खास कारण होते का, या प्रश्नावर हार्दिक म्हणाला, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे आम्ही दोघे भेटलो. नंतर घराघरात पोहोचलो. या मालिकेच्या पार्श्वभूमीला कोल्हापूर होते. तिथेच मालिकेचे सगळे कथानक घडते. म्हणून आम्ही तिथे साखरपुडा केला.

https://www.instagram.com/p/CeK6QgFK725/?utm_source=ig_web_copy_link

हार्दिक जोशीला अक्षया देवधरबद्दल विचारले असता तो म्हणाला, आम्ही अगोदर खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे अक्षया कुठे कशी प्रतिक्रिया देईल, हे मला चांगले ठाऊक असते. आम्ही दोघे एकमेकांना अगदी जवळून ओळखतो. लग्नानंतर अक्षयाने एक गोष्ट बदलावी, असे हार्दिकचे म्हणणे आहे. ती म्हणजे तिने संतापावर ताबा मिळवला पाहिजे. अक्षया लगेच संतापते. तिला पटकन राग येतो. लग्नानंतर तिने यात बदल करायला हवा.

https://www.instagram.com/p/Cele4uyr669/?utm_source=ig_web_copy_link

३ मे रोजी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या दोघांचा साखरपुडा झाला. अक्षया-हार्दिक यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली ती ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवरच. ही मालिका सुरू झाली तेव्हा दोघांच्या खासगी आयुष्याबद्दलही बरीच चर्चा झाली. अक्षयाच्या आयुष्यात तेव्हा हार्दिक नव्हता. एका अभिनेत्यासोबत ती नात्यात होती; परंतु काही कारणांमुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अक्षयाच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता; पण तेव्हाच हार्दिक आणि अक्षया या दोघांचा जीव एकमेकांत रंगायला लागला होता. त्यानंतर हार्दिक आणि अक्षया यांचा साखरपुडा झाला. आता लवकरच हे दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. हे दोघे नेमके कधी लग्न करणार, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे.

Share