औरंगाबादमध्ये मनसेतर्फे हनुमान चालिसेचे पठण, मनसेच्या भूमिकेला भाजपचे समर्थन

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावरुन संपूर्ण राज्यात राजकारण तापल. आज हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर मनसेतर्फे शहरातील औरंगपुरा येथील हनुमान मंदीरात हनुमान चालिसेचे पठण करण्यात आले. यावेळी मनसेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसेच्या वतीने मोफत हनुमान चालिसा पुस्तिकेचे वाटप देखील करण्यात आले. मनसेने हा कार्यक्रम आयोजीत केला म्हणून पोलीसांच्या वतीने मनसे पदाधिकाऱ्यांना १४९ ची नोटीस देण्यात आली होती. याबाबतीत मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकरांना विचारले असता त्यांनी सांगितले, “हे सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. असे असले तरी आम्ही राजसाहेबांच्या आदेशाचे पालन करणारचं. आणि आम्ही शांततेत जर आमच्या धर्माचे काम करणार असू तर त्यात कोणाला काही आक्षेप घेण्याचे कारण नाही. यापुढेही आम्ही राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करत प्रत्येक वार्डात जाऊन हनुमान चालिसेचे पठण करणार आहोत.”

तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी मनसेच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, “मनसेच्या हिंदूत्ववादी भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्रात जो कोणी हिंदूत्वाची भूमिका घेईल त्याच्या सोबत भाजप नेहमीच असेल.”

Share