किरीट सोमय्यांचे उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी यांच्यावर सातत्याने आरोपांची राळ उडवणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. हिंमत असेल तर माझ्याशी आमने-सामने चर्चा करा, असे खुले आव्हानच सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिले.

पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत हे बोलवते धनी असून, उद्धव ठाकरे हे मास्टरमाईंड आहेत. माझ्यावर ‘पीएपी’ लाटल्याचा आरोप केला; पण यासंबंधी एकही आरोप सिद्ध झाला नाही. किरीट सोमय्या, मेधा सोमय्या, नील सोमय्या यांना फसवण्याचा प्रयत्न केला; परंतु आमच्याविरोधात एकही पुरावा मात्र दिला नाही. काल ट्विट केले, १०० कोटींचा घोटाळा, ‘सामना’त बातमी दिली की, ३ कोटींचा घोटाळा, यानंतर उद्धव ठाकरेंनी याच्या चौकशीचे आदेश दिले. मी जेवढे घोटाळे काढले सगळ्यांचे पुरावे दिले. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी हिंमत असेल तर माझ्याशी आमने-सामने चर्चा करावी. माझे त्यांना खुले आव्हान आहे, असेही सोमय्या यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे ‘श्री जी होम्स’ या कंपनीत भागीदार असून, या कंपनीकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे एक इमारत उभारण्यात आली आहे. कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या या इमारतीच्या बांधकाम प्रकल्पासाठी श्रीधर पाटणकर यांचा काळा पैसा वापरण्यात आला आहे. या प्रकल्पातील २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये हे आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून कंपनीत आले आहेत. त्यासाठी श्रीधर पाटणकर यांनी हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी याची मदत घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ‘श्री जी होम्स’ या कंपनीशी काय संबंध आहे, हे जाहीर करावे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

दरम्यान, ‘श्री जी होम्स’ मध्ये आलेले पैसे हे शेल (बनावट) कंपनीतून आले आहेत. हे पैसे बेनामी असून, ईडी आणि आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांशी आपण याबाबत चर्चा केली आहे. ‘श्री जी होम्स’ ची ही बेनामी संपत्ती घोषित करून त्यावर जप्ती आणावी, अशी मागणी आपण केल्याचे सोमय्या यावेळी म्हणाले. ‘श्री जी होम्स’चा खरा मालक कोण? हे लपवण्यासी लेयर तयार करण्यात आल्या. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई करावी, या मागणीवर त्यांच्याकडून आपल्याला आश्वासनही देण्यात आले आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.

Share