महाराष्ट्रात यंदा साखरेचे विक्रमी १३२ लाख टन उत्पादन; गाळप पूर्ण होईपर्यंत हंगाम सुरू ठेवणार

पुणे : यावर्षी महाराष्ट्रात उसाचे मुबलक उत्पादन झाले असून, अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झाली आहे. दुसरीकडे साखर उत्पादनाचे शंभर वर्षांतील सर्व विक्रम तोडताना यंदा राज्याने उत्पादनाचा नवा इतिहास रचला आहे. आतापर्यंत राज्यात १३२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, आणखी ५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.

बाजारात मोठ्या प्रमाणावर साखर येऊनही साखरेचे दर न कोसळल्याने प्रथमच कारखान्यासह उत्पादकांचीही चांदी झाली आहे. दरम्यान, आजही ९६ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. राज्यात अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाविना शिल्लक असून, संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण होईपर्यंत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हंगाम लांबण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी राज्यात १०६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र साखर उद्योगाने मागील सर्व विक्रम तोडले आहेत. उसाचे वाढलेले क्षेत्र, मराठवाडा व इतर भागांत पडलेला पाऊस, भरलेले जायकवाडी धरण यामुळे यंदा उसाचे उत्पादन वाढले. याचाच परिणाम म्हणून साखर उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. हंगाम सुरू होऊन सहा महिने उलटले, तरी अजूनही ९६ कारखान्यांची धुराडी पेटलेली आहेत. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ५४ कारखाने सुरू होते, यंदा त्याचा आकडा जवळजवळ दुप्पट आहे.

यंदा राज्यात २०० साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला. ८ मे अखेर १०४ कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. उर्वरित बहुतांश कारखान्यांचा हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहील, तर पाच ते सहा कारखाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहतील, असा अंदाज आहे. यंदा साखर उत्पादन वाढल्याने दर कोसळतील, अशी भीती होती; परंतु तसे झाले नाही. देशातून झालेली ८० लाख टन साखरेची विक्रमी निर्यात, दर स्थिर राहिल्याने आणि उसाच्या रसापासून १४० कोटी लिटर इथेनॉल निर्मिती केल्याने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला.

उसाचे संपूर्ण गाळप पूर्ण होईपर्यंत हंगाम सुरू

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, राज्यातील उसाचे संपूर्ण गाळप पूर्ण होईपर्यंत हंगाम सुरू ठेवण्यात येणार आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगला दर मिळाला. यामुळे या उद्योगाचा गोडवा वाढला. इथेनॉल निर्मितीकडे ऊस वळविल्याचाही मोठा फायदा झाला.

साखरेच्या आकडेवारीचा गोडवा

  • राज्यातील सुरू झालेले कारखाने —– २००
  • गळित हंगाम बंद झालेले —– १०४
  • राज्यातील उसाचे क्षेत्र —– साडे तेरा लाख हेक्टर
  • साखर उत्पादन —– १३२ लाख टन
  • अजून अपेक्षित साखर उत्पादन —– ५ लाख टन
  • देशातून साखर निर्यात —– ८० लाख टन
  • इथेनॉल निर्मिती —– १४० कोटी लिटर
Share