सचिन वाझे होणार माफीचा साक्षीदार; न्यायालयाची मंजुरी

मुंबई : १०० कोटी वसुली प्रकरणातील सहआरोपी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणार्‍या बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याचा माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टाने मंजूर केला आहे.

सचिन वाझेने १०० कोटी रुपये वसुली प्रकरणातील आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जाला अटी-शर्तींसह न्यायालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे १०० कोटी रुपये खंडणी वसुली प्रकरणात सहआरोपी असून, सध्या वाझे कोठडीत आहे. आपल्याला माफीचा साक्षीदार बनवावे, असा अर्ज त्याने मुंबई सत्र न्यायालयात केला होता. संबंधित अर्जाला आता न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार आहेत. संबंधित गुन्ह्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आरोपी तर सचिन वाझे सहआरोपी आहेत. कथित खंडणी प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या लोकांबद्दल आपल्याकडे असलेली माहिती देण्यास तयार असल्याचे वाझेने म्हटले आहे. यासाठी आपल्याला माफीचा साक्षीदार करावे, असे त्याने कोर्टात सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. त्याच्या या अर्जाला विशेष सीबीआय कोर्टाने काही अटी-शर्तींसह मंजुरी दिली आहे.

या अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असताना अनिल देशमुख यांचे खासगी स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या वतीने संबंधित अर्जाला विरोध करण्यात आला; पण शिंदे यांच्या अर्जावर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला. एक आरोपी दुसऱ्या आरोपीच्या माफीचा साक्षीदार होण्यावर आक्षेप घेऊ शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. या सुनावणी दरम्यान आज सचिन वाझे याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी वाझेच्या अर्जाला मंजुरी देत त्याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आले. यावेळी न्यायालयाने माफीचा साक्षीदार होण्याबाबतच्या सर्व अटी आणि शर्तीची कल्पना करून दिली. ७ जून रोजी माफीचा साक्षीदार होण्याच्या कागदपत्रांवर सचिन वाझे याची स्वाक्षरी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या सुनावणीस सचिन वाझे याला प्रत्यक्ष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Share