सौरव गांगुलींनी राजीनामा दिलेला नाही; बीसीसीआयचे स्पष्टीकरण

मुंबई : सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता बीसीसीआयने यावर खुलासा केला आहे. सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण बीबीसीआयचे सरचिटणीस जय शहा यांनी दिले आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्विटमुळे त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. आपण काहीतरी नवीन सुरू करणार असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. लोढा समितीच्या शिफारसीनुसार तुम्ही बीसीसीआयमध्ये एखाद्या पदावर असेपर्यंत दुसरी कोणतीही गोष्ट करून शकत नाही. त्यामुळे लाभाच्या पदाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. दरम्यान, सौरभ गांगुली गांगुली यांनी आपल्या पोस्टमध्ये नव्या इनिंगचे संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांनी बीसीसीआयचा राजीनामा तर दिला नाही ना? अशी चर्चा सुरू झाली होती.

सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते. सुरुवातीला कोणालाही याचा पत्ता नव्हता की, गांगुली यांनी खरंच राजीनामा दिला आहे की नाही? गांगुली यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा रंगली होती. गांगुली आता राजकारणात प्रवेश करणार, अशीही चर्चा सुरू झाली होती; पण ही राजीनाम्याची अफवा नेमकी कुठून आली, याबाबतची गोष्ट आता समोर आली आहे.

गांगुली यांनी काय म्हटले होते ट्विटमध्ये?

गांगुली यांनी एक ट्विट केले आणि त्यानंतर क्रिकेट वर्तुळात त्यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अशी बातमी पसरली. गांगुली यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते की, ” मी १९९२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात केली, या गोष्टीला आता ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आतापर्यंत ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या प्रत्येक व्यक्तीचे मी धन्यवाद मानू इच्छितो. क्रिकेटने आतापर्यंत मला बरेच काही दिले आहे; पण आता मला काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून या गोष्टीचा फायदा बऱ्याच लोकांना होऊ शकतो. आयुष्यात यापुढेही तुम्ही मला कायम पाठिंबा द्याल, अशी आशा मी करतो.” या पोस्टमुळे गांगुली आता बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडत आहेत, अशी अफवा काही जणांनी पसरवली; परंतु त्याचवेळी गांगुली यांनी नेमके काय म्हटले आहे, हे कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही.

घोळ नेमका कसा झाला?
गांगुली यांनी यावेळी आपली क्रिकेटमधली ३० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या प्रवासातील प्रत्येकाचे आपण आभार मानतो, असे ट्विटमध्ये लिहिले होते. त्याचबरोबर आपण आता एक नवीन गोष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चाहत्यांना मात्र गांगुली बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडत असल्यामुळे सर्वांचे आभार मानत आहेत आणि त्यानंतर एक क्रिकेट सोडून एक वेगळी गष्ट करणार आहेत, असे वाटले. त्यामुळे हा सर्व घोळ झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्यानंतर बीबीसीआयचे सरचिटणीस जय शहा यांनी हे वृत्त सत्य नसल्याचे स्पष्ट केले आणि या चर्चेला पूर्णविराम मिळाला. जर जय शहा यांनी स्पष्टीकरण दिले नसते तर ही अफवा अजूनच पसरली असती आणि लोकांना राजीनाम्याची गोष्ट खरी वाटली असती; पण आता गांगुली यांच्या राजीनाम्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share