दोन मुलांनी जन्मदात्या बापालाच घातला २ लाखाचा गंडा

सोलापूर : ‘ना बाप बडा, ना भैय्या….सबसे बडा रुपय्या’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. कारण, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी या गावात राहणाऱ्या दोन सख्या भावांनी मिळून जन्मदात्या शेतकरी बापाला २ लाख रुपयांची टोपी घातली. त्यांनी आपल्या वडिलांचे एटीएम कार्ड वापरून बँकेतील त्यांच्या खात्यातून २ लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपी मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी येथील शेतकरी जगन्नाथ भुजंगा कोकरे यांचे मोहोळ शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये खाते आहे. त्या खात्यात त्यांनी २ लाखापेक्षा जास्तीची रक्कम बचत म्हणून शिल्लक ठेवली होती. त्या खात्याला संलग्नित एटीएम कार्डही त्यांनी काढले होते. मात्र, त्याचा वापर केला नव्हता. मंगळवारी (३१ मे) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते मोहोळ येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गेले व त्यांनी २ लाख रुपये काढण्यासाठी विड्रॉल भरला. मात्र, जगन्नाथ कोकरे यांच्या खात्यामध्ये केवळ ६४७ रुपये शिल्लक असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ऐकताच जगन्नाथ कोकरे यांनी यासंदर्भात तात्काळ बँकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारीच्या सुरांत चौकशी केली असता, त्यांच्या एटीएमच्या माध्यमातून २४ मेपासून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेळोवेळी २ लाख रुपये काढून घेतले असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही माहिती ऐकूण कोकरे यांना धक्काच बसला.

त्यानंतर अधिक चौकशी केल्यावर जगन्नाथ कोकरे यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे सागर कोकरे आणि सचिन कोकरे यांनी संगनमत करून वडिलांना काहीच कल्पना न देता त्यांच्या परस्पर रक्कम काढल्याचे समोर आले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या दोघांनी बापाच्या बचत खात्यामधून २ लाख रुपये एटीएममधून हडप केल्याचे उघड झाले. याप्रकरणी जगन्नाथ कोकरे यांनी आपल्या सागर कोकरे आणि सचिन कोकरे या दोन्ही मुलांच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सागर कोकरे आणि सचिन कोकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share