आषाढी एकादशीनिमित्त पैठण येथून २० जूनला निघणार संत एकनाथांची पालखी

औरंगाबाद : कोरोना काळात सलग दोन वर्षे आषाढी एकादशीनिमित्त निघणाऱ्या पायी वाऱ्या बंद होत्या. यंदा मात्र विविध ठिकाणचे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होणार आहेत. या वारी सोहळ्यातीलच एक अत्यंत मानाची पालखी म्हणजे पैठण येथील संत एकनाथ महाराजांची पालखी. या पालखी सोहळ्याचे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधून २० जून रोजी प्रस्थान होणार आहे. पालखी मार्गावरील गावांतील भाविकांनीही पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.

नाथांच्या पालखी सोहळ्याच्या रथामागे अमरावतीसह मराठवाड्यातील छोट्या-मोठ्या दिंड्या सहभागी होतात. सुमारे दहा ते पंधरा हजाराहून अधिक वारकरी भानुदास एकनाथाचा जयघोष करीत ऊन, वारा, पाऊस अंगावर घेत आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात. संत एकनाथांच्या पालखी सोहळ्याला चारशेहून अधिक वर्षांची परंपरा आहे. या सोहळ्यात कोरोना महामारीमुळे खंड पडला होता. आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून पायी वारी दोन वर्षे बंद होती. तरीही आषाढी वारीला संत भेटींचे महत्त्व असल्यामुळे मोजक्या मानकन्यांच्या सहभागातून प्रथमच नाथांच्या पादुका विशेष वाहनातून नेत पांडुरंगाची आणि संतांची भेट घडवून आणली गेली. यंदा मात्र नाथांचा पालखी सोहळा पायीवारीने पंढरपुरात दाखल होणार आहे.

असा असेल पालखी सोहळ्याचा कार्यक्रम

  • संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे २० जून रोजी पैठण येथून प्रस्थान होईल.
  • सलग १९ दिवस २७५ किलोमीटरचा प्रवास करत ६९ गावांतून १९ ठिकाणी पालखी मुक्कामी थांबेल.
  • ०९ जुलै रोजी दशमीला संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचा होळे गावात भीमा स्नान सोहळा पार पडणार आहे.
  • ०९ जुलै रोजी दशमीला संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.
  • १२ जुलै रोजी नाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास महाराज यांची पुण्यतिथी विठ्ठल मंदिरात साजरी करण्यात येते.
  • पालखी सोहळ्याचा पंढरपूरमध्ये ०४ दिवस नाथचौकातील नाथ मंदिरात मुक्काम असतो.
  • पालखी सोहळ्याचे मालक प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले आदींच्या मार्गदर्शनाखाली कीर्तन भजन आयोजित केले जाते.
  • विठ्ठल रखुमाई मंदिरात १३ जुलै रोजी काला दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर नाथांचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो.
Share