पुणे : राज्यातील मराठा आणि कुणबी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेचा आता राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे. पुण्यात मुख्यालय असलेल्या ‘सारथी’ संस्थेची आता मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी विभागीय मुख्यालये होणार आहे. त्यामुळे त्या भागातील संबंधित विद्यार्थ्यांना आपापल्या भागात स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे.
‘सारथी’ या संस्थेची स्थापना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २५ जून २०१८ रोजी करण्यात आली आहे. ‘सारथी’ संस्थेचे मुख्यालय पुणे येथे सुरू झालेले असून, या ठिकाणी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी पुण्यात येत आहेत. त्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्यात सहा विभागीय मुख्यालये सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली.
‘सारथी’ संस्थेची राज्यात विभागीय मुख्यालये सुरू करण्याचे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयांकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबईत खारघर येथे ‘सारथी’ च्या विभागीय मुख्यालयासाठी सुमारे साडेतीन हजार चौरस मीटरची जागा निश्चित करण्यात आली आहे. नाशिक येथे सुमारे दीड एकर जागा निवडण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील गारखेडा परिसरात १ हेक्टर २४ आर जागेवर विभागीय मुख्यालय उभारले जाणार आहे. लातूरमध्ये तीन एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. सध्या त्या ठिकाणी मुलींचे आयटीआय आहे. अमरावतीमध्ये नवसारी येथे १ हेक्टर ५७ आर जागेवर विभागीय मुख्यालय बांधण्याचा प्रस्ताव आहे. नागपूरमध्ये सीताबर्डी या ठिकाणी सुमारे सव्वादोन एकर जागा ‘सारथी’ संस्थेच्या विभागीय मुख्यालयासाठी निवडण्यात आली आहे, असे अशोक काकडे यांनी सांगितले.
पुण्यात मुख्यालयाच्या नवीन इमारत उभारणीचे काम सुरू
‘सारथी’ संस्थेकडून मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षांच्या तयारीबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास आणि संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यकम, शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे. सध्या पुण्यात मुख्यालयामध्ये हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. मुख्यालयाची नवीन इमारत उभारणीचे काम सुरू झाले असून, ही इमारत इको-फ्रेंडली असणार आहे. आगरकर रस्त्यालगत असलेल्या ४१६३ चौरस मीटर जागेवर ही इमारत बांधण्यात येणार आहे, अशी माहिती काकडे यांनी दिली.
विभागीय मुख्यालयांमध्ये वसतिगृहे बांधणार
विभागीय मुख्यालयांमध्ये वसतिगृहे बांधण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी ५०० मुलांसाठी आणि ५०० मुलींसाठी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची राहण्याची अडचण दूर होणार आहे, असेही काकडे यांनी सांगितले.