औरंगाबाद : व्हॉट्सॲपवर ‘साॅरी भावांनो !’ असे स्टेट्स ठेवून एका तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर (ता.वैजापूर) येथे घडली आहे. ज्ञानेश्वर कैलास चव्हाण (रा.शिऊर, ता.वैजापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
ज्ञानेश्वर कैलास चव्हाण हा कुटुंबाबरोबर शिऊर (ता.वैजापूर) येथे वरचा पाडा भागात राहत होता. सोमवारी (२ मे) रात्री तो घरात कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला. नंतर ज्ञानेश्वरने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यापूर्वी त्याने व्हॉट्सॲपवर ‘साॅरी भावांनो !’ असे स्टेट्स ठेवले होते. हे स्टेट्स पाहून ज्ञानेश्वरचा शोध घेतला असता शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळला. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता, असे सांगण्यात येते. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत ज्ञानेश्वर चव्हाण हा अविवाहित होता. शेवटच्या क्षणी त्याने व्हॉट्सॲपवर ‘साॅरी भावांनो !’ असे स्टेट्स ठेवून जगाचा निरोप घेतला. ज्ञानेश्वर हा मनमिळावू होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे शिऊर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.