‘चंद्रमुखी’ची बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

मुंबई : गेल्या वर्षभरापासून ज्या ‘चंद्रमुखी’ची चर्चा रंगली होती तो चित्रपट अखेर २९ एप्रिलला महाराष्ट्रासह परदेशातही प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची हवा सर्वत्र होती. आता बॉक्स ऑफिसवरही ‘चंद्रमुखी’ चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘चंद्रमुखी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी एक कोटीची कमाई केली आहे.

‘चंद्रमुखी’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो चर्चेत होता. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, डॉ. मोहन आगाशे, अशोक शिंदे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, नेहा दंडाळे, राधा सागर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसतोय. मराठी चित्रपटासाठी प्राइम टाइम मिळत नसल्याचा सूर उमटत असताना ‘चंद्रमुखी’ने मात्र बॉक्स ऑफिसवर कब्जा केल्याचे दिसून येत आहे. हा चित्रपट प्रदर्शत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १.२१ कोटींचा गल्ला या चित्रपटाने कमावला होता.

सोशल मीडियावरदेखील चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर याची प्रचिती आली. विमानतळावर सर्वत्र ढोलकीचा ताल आणि घुंगरांचे बोल घुमत होते. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी साक्षात चंद्रमुखी आणि दौलतराव चित्रपटाच्या टीमसह विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.

https://www.instagram.com/p/CdD48sXp2Wg/?utm_source=ig_web_copy_link

नऊवारी साडी आणि साजशृंगाराने सजलेली चंद्रमुखी म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘चंद्रा’ या लावणीवर नृत्य करत उपस्थितांना घायाळ केले. यावेळी तिथल्या हवाईसुंदरींनीही अमृतासह ‘चंद्रा’ या गाण्यावर ठेका धरला. विशेष म्हणजे एका विमानावरही चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले होते. बॉलिवूडपटांप्रमाणेच मराठी चित्रपटही प्रमोशनच्या नवीन संकल्पना घेऊन येतेय, हे सिद्ध करत ‘प्लॅनेट मराठी’ने मराठी चित्रपटविश्वात एक सकारात्मक पायंडा पाडला आहे, अशी चर्चा सध्या रंगली आहे. प्रथमच असा वेगळा प्रयोग झाल्यामुळे याची चर्चा आणि कौतुक विविध स्तरांमधून होत आहे.

प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आम्ही सुखावलो -अक्षय बर्दापूरकर
‘चंद्रमुखी’ चित्रपटाचे निर्माते आणि ‘प्लॅनेट मराठी’ चे प्रमुख संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले की, चित्रपट तयार झाल्यानंतर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचे योग्य मार्केटिंग होणे गरजेचे असते. हे बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे; पण मराठीत दर्जेदार चित्रपट येऊनही त्याचे हवे तेवढे मार्केटिंग होत नाही. त्यामुळे ‘चंद्रमुखी’च्या निमित्ताने आम्ही शक्य तेवढ्या नवीन मार्केटिंग प्लानिंगसह काम करण्याचे ठरवले. त्याचाच एक भाग म्हणजे ‘चंद्रमुखी’ चे विमानतळावरील प्रमोशन. विमानतळावरील प्रेक्षकांचा उत्साह व प्रतिसाद पाहून मी आणि आमची टीम सुखावलो. याचा सकारात्मक परिणाम आम्हाला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला याचा आनंद आहे.

Share