केकेच्या चेहऱ्यावर आढळल्या जखमांच्या खुणा; पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद

नवी दिल्ली : बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. के.के कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडली आणि तो अचानक खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

एनएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केके यांच्या मृत्यूनंतर पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू झाल्याची केस दाखल झाली आहे. आता पोलीस त्यादृष्टीने तपास करण्याची शक्यता आहे. मात्र, केके यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. केके यांच्या कुटुंबीयांची अनुमती मिळाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात येईल. त्यासाठी एसएसकेएम रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.

या सगळ्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून सध्या कोलकाताच्या कॉन्सर्टचे आयोजक आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. केके यांच्या डोक्यावर आणि ओठावर जखमी असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

Share