मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. राज ठाकरे यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. पायाच्या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे यांना काल लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.दरम्यान या शस्त्रक्रियेपूर्वी करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे.

राज ठाकरे यांना मागच्या काही दिवसात ठाणे, औरंगबाद आणि पुणे येथे सभा घेतल्या होत्या, पुण्यातील सभेत त्यांनी त्यांच्या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली होती. त्यानंतर आज ते लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेपूर्वीच्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. या आधी देखील राज ठाकरे यांना कोरोना झाला होता. दरम्यान कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशीया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.

दरम्यान मागील काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि अयोध्या दौऱ्यामुळे राज ठाकरे चर्चेत आले होते. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदाराने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. उत्तर प्रदेशमध्ये यायचे असेल तर अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागा अशी मागणी या भाजपा खासदाराने केली होती. त्यानंतर माझा दौरा अयशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता.

Share