‘त्या’ बंडखोर आमदारांना आसामऐवजी बंगालला पाठवा : ममता बॅनर्जी

कोलकाता : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून, महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार सध्या आसाममधील गुवाहाटी येथे एका हॉटेलमध्ये आहेत. या सगळ्या गोंधळात आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनीही उडी घेतली आहे. त्या बंडखोर आमदारांना आसामऐवजी बंगालला पाठवा. आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करू, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप करून, कोणीतरी तुमचाही पक्ष एक दिवस फोडेल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या, आम्हाला उद्धव ठाकरे आणि सर्वांनाच न्याय मिळवून द्यायचा आहे. आज भाजप सत्तेत आहे. तुम्ही मनी, मसल, माफियाची ताकद वापरत आहात; पण एक दिवस तुम्हालाही जावे लागेल. कोणीतरी तुमचा पक्षही फोडेल. सध्या जे घडत आहे ते चुकीचे आहे. मी या गोष्टीला पाठिंबा देत नाही. आसामऐवजी त्या बंडखोर आमदारांना बंगालला पाठवा. आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करू. महाराष्ट्रानंतर ते इतर सरकारांनाही धक्का देतील. आम्हाला लोकांसाठी, संविधानासाठी न्याय हवा आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह सूरतमधील ली मेरेडियन हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, बुधवारी पहाटे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सूरतहून खास विमानाने आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटी येथे रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. या हॉटेलबाहेर तगडा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज गुरुवार सकाळी तृणमूल कॉँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या हॉटेलच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. त्यानंतर ममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Share