…का उगाच वणवण भटकताय? संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना आवाहन

मुंबई : चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वणवण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ, असे आवाहन शिवसेना नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केले आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ३५ हून अधिक आमदारांसह बंड पुकारल्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली आहे. त्याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची चिन्हे आहेत. मात्र, अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत करत आहेत. आज गुरुवारी (२३ जून) दुपारी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत खा. संजय राऊत बंडखोर आमदारांबाबत बोलताना म्हणाले, महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडले पाहिजे आणि वेगळा विचार करायला पाहिजे, अशी इच्छा त्या सर्व आमदारांची असेल, तर त्याआधी त्यांनी महाराष्ट्रात यावे, मुंबईत यावे आणि त्यांची जी मागणी आहे, ती त्यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल; पण आधी त्यांनी मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी.

तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण सच्चे शिवसैनिक आहात, शिवसैनिक असल्याचे तुम्ही सांगता आणि शिवसेना सोडणार नाही, असेही तुम्ही सांगता, मग मुंबईत या आणि आपली भूमिका मांडा. आमची भूमिका केवळ सध्याच्या सरकारविषयी आहे; पण महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही येथे येण्याची हिंमत दाखवा, उद्धव ठाकरे यांच्यासमोर या, आपली भूमिका मांडा, तुमच्या भूमिकेचा नक्की विचार केला जाईल. २४ तासांत परत या, हे मी जबाबदारीने सांगतोय. मी हवेत भूमिका मांडत नाही, असेही खा. राऊत यावेळी म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सायंकाळी एक ट्विट करून, राज्यातील सत्ता संघर्षावर चर्चेमधून तोडगा निघू शकतो, अशी थेट ऑफर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अन्य बंडखोर आमदारांना दिली आहे. ”चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वणवण भटकताय? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ! जय महाराष्ट्र!” असे संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी संजय राऊत यांनी शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडले पाहिजे असे वाटत असेल, तर २४ तासांत मुंबईत या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करा, असे थेट आवाहन बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे यांना केले होते. बंडखोर आमदारांनी महाराष्ट्रात येऊन चर्चा करावी. गुवाहाटीमध्ये बसून पत्रव्यवहार करू नये, असा सल्लाही त्यांनी बंडखोर आमदारांना दिला होता. त्यानंतर आता परत एकदा राऊत यांनी ट्विट करत चर्चेतून मार्ग निघू शकतो, चर्चा होऊ शकते, असे म्हणत बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे.

Share