राणा दाम्पत्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक, घरासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी

अमरावती : आमदार रवी राणा यांनी काल शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर हनुमान जयंतीनिमित्त हनुमान चालिसाचे पठण करावे, असे म्हटले होते. ते करीत नसतील तर आपण स्वत: खासदार नवनीत राणा यांच्यासह ‘मातोश्री’पुढे हनुमान चालिसाचे वाचन करू, असेही ते म्हणाले होते. यानंतर वातावरण चांगलच तापल्याच दिसत आहे.

रवी राणा यांच्या घरासमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते. आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. मातोश्री हे आमचं श्रद्धास्थान आहे. तिथे येऊन कुणी आव्हान देण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक ते कधीही सहन करणार नाही. जशास तसं उत्तर दिलं जाईल असं शिवसैनिकांनी म्हटलं आहे. तसेच मातोश्रीवर जाण्याचे स्वप्न बघू नका व हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, अशी प्रतिक्रिया युवासेनेचे सागर देशमुख यांनी दिली. तसेच रवी राणा आणि शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते. या आवाहनांना आम्ही विचारत नाही. उद्धव ठाकरेंनी काय वाचावं, काय करावं हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही आमदार आहात, तुम्ही तुमचं काम करा, असं म्हणत पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.

Share