‘टॉयलेट घोटाळा’ प्रकरणी संजय राऊतांचे आरोप खोटे : किरीट सोमय्या

मुंबई : भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कुटुंबीयांकडून चालविण्यात येणाऱ्या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि अन्य ठिकाणी जवळपास १०० कोटी रुपयांचा ‘टॉयलेट घोटाळा’ करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, संजय राऊतांचे हे आरोप किरीट सोमय्यांनी फेटाळले असून, या आरोपात काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. कोणतीही कारवाई करण्याआधी आमच्याशी संपर्क करा, असे पत्र सोमय्या यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांना पाठवले आहे.

किरीट सोमय्या यांनी नगर विकास खात्याचे सचिव भूषण गगराणी यांच्यासह एमएमआरडीए, मुंबई पोलिस, मीरा-भाईंदर पोलिस, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वन खाते आदी विभागांना पत्र लिहिले आहे. माझ्यावर लावलेले आरोप खोटे आहेत. कोणत्या आधारावर १०० कोटींचा घोटाळा झाला, असा प्रश्नही सोमय्या यांनी विचारला आहे. हा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प होता. जमीनदेखील सरकारची आहे. मी माझी बाजू आपली स्पष्ट करत नसून यातील सत्यस्थिती सांगत असल्याचे सोमय्या यांनी या पत्रात नमूद केले आहे.
‘टॉयलेट घोटाळ्या’चे आरोप राजकीय हेतूने करत आहेत. त्याची आम्ही गंभीर दखल घेतो. यासंबधी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी या संपूर्ण उपरोक्त गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करावा, आवश्यकता असल्यास आमच्याशी संपर्क करावा, आम्हीही संबंधित माहिती द्यायला तयार आहेत. राजकीय किंवा अन्य दडपणाखाली सोमय्या परिवाराच्या विरोधात गुन्हा नोंदवायचा अशा प्रकारची कृती अधिकारी वर्ग करणार नाही, असा विश्वास व्यक्त करतो, असेही सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.

 

मी उद्धव ठाकरे कुटुंबीयांचे १९ कोटींचे मनी लाँड्रिंगचे प्रकरण बाहेर काढले. त्यानंतर संजय राऊत यांनी ‘इव्हेंट’ केला. ‘सामना’मध्ये राऊत यांनी तीन कोटी असे लिहिले आहे. मात्र, पत्रकारांसमोर त्यांनी आकडा फुगवला. संजय राऊत यांना दमडीची किंमत नाही. मी यासंदर्भात मिरा-भाईंदर पालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. १०० कोटीचा आकडा आणला कुठून, असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे. ही नौटंकी चालली आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे ‘टॉयलेट घोटाळा’?

मिरा भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याची दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते.

Share