किरीट सोमय्यांविरोधात शिवसेना आक्रमक, औरंगाबादेतही जोडे मारो आंदोलन

औरंगाबाद : आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. याचेच पडसाद औरंगाबादमध्येही उमटल्याचे बघायला मिळाले. किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेनेच्या वतीने राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. औरंगाबादमध्येही शिवसेनेने क्रांती चौकात आंदोलन केलं.

आयएनएस विक्रांतच्या नावाखाली खंडणी गोळा करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली. भाजपविरोधात तसेच किरीट सोमय्या यांच्याविरोधात क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला.  तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.

Share