पुणे शहराध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रीया

पुणे : राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्याविरोधात भूमिका घेतल्याने मनसेत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. राज ठाकरेंच्या या आदेशाला वसंत मोरे यांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्याचा निर्णय खुद्द मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला होता. दरम्यान, साईनाथ बाबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवीन शहराध्यक्ष असतील, अशी घोषणादेखील राज ठाकरे यांनी केली केली होती. त्यामुळे वसंत मोरे पक्ष सोडतात की काय ? असा प्रश्न निर्माण झाला होता.

यावर वसंत मोरेंनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रीया दिली आहे. मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, इतक्यात तरी मनसे सोडायची इच्छा नाही, त्यामुळे साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे, तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. गेली २७ वर्षे मी राज ठाकरेंसोबत आहे. त्यामुळे पुढेही त्यांच्या सोबत राहीन. माझं साहेबांशी काही बोलणं झालं नाही, माझं पुण्याचं अध्यक्षपद गेलंंय. मात्र अजूनही माझं मनसे सैनिक पद गेलेलं नाही. मला अविनाश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत, असेही ते म्हणाले. मी थोडासा सेंटिमेंटल आहे, हे राज ठाकरे साहेबांनाही माहिती आहे, तसेच मला इतर पक्षात येण्यासाठी आता फक्त पंतप्रधानांचाच फोन यायचा बाकी आहे, अशी खोचक प्रतिक्रिया ही वसंत मोरे यांनी दिली आहे.

Share