शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : ज्यांनी हे सरकार स्थापन केले त्यांच्या मते त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले; पण ते चुकीचे आहे. तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे नाही. आता राज्याचे झालेले मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत. शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याचे मानायला नकार दिला.

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसह केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मला दिलेला शब्द भाजपने पाळला असता, तर शानदार पद्धतीने हे सरकार आले असते, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला खरमरीत टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपसोबत झालेल्या अडीच-अडीच वर्षांच्या सत्तेसंदर्भातील चर्चेवर भाष्य केले. कालच मी नव्या सरकारचे अभिनंदन केले, असे म्हणत ठाकरे म्हणाले, माझे आणि अमित शहा यांचे हेच तर ठरले होते की, शिवसेना-भाजपने पुढील पाच वर्षात अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा काळ वाटून घ्यावा. जर तसे झाले असते तर आज अडीच वर्ष झालेलीच आहेत, जे काय घडले ते सन्मानाने झाले असते. ही आताची जोडगोळी, कदाचित अशाच पद्धतीने त्यांनी अडीच वर्ष पूर्ण केली असती, मग त्यावेळी नकार देऊन भाजपने आताच असे का केले, हा प्रश्न माझ्याप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. मी तर तेव्हाही सांगितले होते की, पहिला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर एक पत्र तयार करून त्यावर मुख्यमंत्र्याची सही, पक्षप्रमुख म्हणून माझी सही आणि आज शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असून आमच्यात ठरलेल्या कराराप्रमाणे या दिवशी पायउतार होईल, असा मजकूर लिहिला असता. हे पत्र मंत्रालयाच्या दाराशी होर्डिंग करून लावा म्हणजे हा करार कोणापासून लपून राहिला नसता, असेही सांगितले होते, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

अडीच वर्षांपूर्वी अमित शहांनी शब्द पाळला असता तर शानदार सरकार असते : उद्धव ठाकरे
अडीच वर्षांपूर्वी अमित शहा आणि माझे जे ठरले होते त्याप्रमाणे अमित शहांनी शब्द पाळला असता, तर महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. ठरल्याप्रमाणे सगळे सन्मानाने झाले असते. भाजपचा अडीच वर्षे मुख्यमंत्री झाला असता. काल जे घडले ते मी अमित शहांना अडीच वर्षे शिवसेनेचे मुख्यमंत्री करा म्हणून आधीच सांगत होतो आणि आता तेच झाले. आता पाचही वर्षं भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही. आता भाजपला काय मिळाले, भाजपच्या मतदारांना काय आनंद मिळाला, यातून जनतेला काय मिळणार हे लवकरच कळेल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना हाणला. शिवसेना अधिकृतपणे त्यावेळी तुमच्यासोबत होती; पण त्यावेळी शहांनी शब्द मोडला. अमित शहांनी शब्द पाळला असता, तर सरकार शानदार असते. जर माझ्यासोबतचा करार मोडला नसता, तर निदान अडीच वर्षे तरी भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता, असेही ते म्हणाले.

लोकसभा-विधानसभेला आम्ही आणि भाजप एकत्र होतो. लोकसभेच्या आधी जे ठरले होते, ते हेच होते. मग मला कशाला मध्ये मुख्यमंत्री बनवायला लावले? तसे झाले असते तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, जे भाजपसोबत जाऊ इच्छितात त्यांनी हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे की, अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि पाठीत वार करून पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला. हा तसा तर शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, कारण शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितले.

माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारने गुरुवारी बहुचर्चित कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-३ चे कांजूरमार्गला नेलेले कारशेड आरे वसाहतीमध्येच करण्याचा निर्णय घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला. त्यावरून पर्यावरणवाद्यांपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावरून राज्य सरकारला आवाहन केले आहे. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की, कृपा करून माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला, त्यात कुठेही अहंकार नाही. मुंबईकरांच्या वतीने माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की, आरेचा आग्रह रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाची हानी होईल. आता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत; पण मधल्या काळात तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो समोर आला होता. म्हणजे तिथे वन्यजीव आहेत. मला धोका हा वाटतो की, आता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर तिथे रहदारी सुरू झाल्यावर आजूबाजूच्या पर्यावरणातील वन्यजीवन धोक्यात येईल. असे करता करता मग आता तिकडे काहीच नाही म्हणत अजून पुढे जाल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आरेच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका; ‘रात्रीस खेळ चाले’ हे त्यांचे ब्रीदवाक्य झाले

आरेच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी ‘रात्रीस खेळ चाले’ हे त्यांचे ब्रीदवाक्य झाल्याचा टोला लगावला. आज तुम्हाला माझा चेहरा पडलेला दिसत असेल. आरेचा निर्णय त्यांनी बदलला म्हणून मला दु:ख झाले आहे. आरेचा प्रस्ताव बदलणे हा अहंकार नव्हता, पर्यावरणासाठी निर्णय घेतलेला होता, तो निर्णय नव्या सरकारने बदलू नये. माझ्यावर राग आहे, तो माझ्यावर काढा. माझ्या पाठीत वार करा; पण मुंबईच्या पाठीत, काळजात सुरा खूपसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. आम्ही मुंबईतील जवळपास ८०० एकरचे जंगल राखीव करून टाकले आहे. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरा. आरेचा मर्यादित वापर होणार होता. कांजूरला कारशेड गेल्यानंतर ती मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही
लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी या चार स्तंभांनी आता पुढे यायला हवे. लोकशाहीचे धिंडवडे थांबवण्याची गरज आहे, ज्याने मत दिले त्याचा बाजार असा मांडला गेला तर ते चुकीचे आहे. मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल, अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसात मला अनेकांचे मेसेज आले. सोशल मीडियातून अनेकांच्या सदिच्छा आल्या. माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा आभारी आहे. मी मुख्यमंत्रिपद सोडताना लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. हीच माझ्या आयुष्याची कमाई आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रूंशी माझ्याकडून कधीही प्रतारणा, गद्दारी होणार नाही. तुमचे हे अश्रू माझी ताकद आहे. सत्ता येवो सत्ता जावो या ताकदीशी मी कधीही प्रतारणा करणार नाही. अशा विचित्र पद्धतीने शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला उतरवून स्वत: मुख्यमंत्री होण्याचा जो अट्टहास केला आहे हा आवडला की, नाही हे जनतेने ठरवायचे आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Share