ठाणे : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ४० आमदार फोडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर नवे सरकार स्थापन केले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेला आणखी एक झटका दिला आहे. ठाणे महानगरपालिकेतील ६६ विद्यमान नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे ठाण्यामध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.
ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी माजी महापौर नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या गटात प्रवेश केला. या सर्व ६६ नगरसेवकांनी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हे ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाल्याने ठाण्यातील शिवसेनेचे अस्तित्व पूर्णपणे पुसले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला आता ठाण्यात शून्यातून संघटना उभारावी लागेल, अशी चिन्हे आहेत.
ठाणे हा शिवसेनेचा मोठा गड मानला जातो. गेली अनेक वर्षे ठाण्यामध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यावर मजबूत पकड आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याची सूत्रे आली होती. आजपर्यंत शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे हेच ठाणे जिल्ह्यातील कारभार सांभाळत होते. त्यामुळे ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व आहे. ठाणे महापालिकेत मागील काही दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीआधीच ठाण्यातील ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याने शिवसेनेपुढील अडचणी वाढल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यापासूनच ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतील एक मोठा गट फुटेल, असा अंदाज व्यक्त केला होता. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे. थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे गटात गेल्याने आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६७ नगरसेवक असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३४, भाजप २३, काँग्रेस ३ आणि एमआयएमचे २ नगरसेवक आहेत. ठाणे महापालिकेचा कार्यकाळ संपला असून, प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह बंड पुकारून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडले. शिंदे यांच्या बंडानंतर आता शिवसेनेच्या खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा पक्षसंघटनेकडे वळवला आहे. दोन दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले होते. त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. भानगिरे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने पुणे महानगरपालिकेतही शिवसेनेच्या नगरसेवकांचा मोठा गट फुटण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नव्हे तर या बंडाची लागण मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही होऊ शकते. असे झाल्यास शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.