उस्मानाबादचे प्रतीक परितेकर ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर

मुंबई : ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर विविध स्तरांतील स्पर्धक सहभागी होत असतात. प्रत्येक व्यक्ती या मंचावर येऊन प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करते. करोड रुपये नाही मिळाले, तरी त्यांनी सांगितलेल्या अनुभवांतून, संघर्षांतून अनेक चांगल्या गोष्टी प्रेक्षकांना शिकायला मिळतात. आज गुरुवारी ७ जुलै रोजी मराठवाड्यातील उस्मानाबादचे वाहनचालक प्रतीक परितेकर हे स्पर्धक ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर स्पर्धक म्हणून सहभागी होत त्यांचे नशीब अजमावणार आहेत.

वाहनचालक असलेले प्रतीक परितेकर यांचा आजवरचा जीवनप्रवास संघर्षमय आणि तितकाच प्रेरणादायी आहे. प्रतीक परितेकर यांच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने लहानपणी सातवीत असतानाच प्रतीक यांनी बाहेर नोकरी करायला सुरुवात केली. त्यांनी हॉटेल, गॅरेज, एमआयडीसी, दुकान, बिअर बार अशा वेगवेगळ्या ठिकाणी कामे केली आहेत. वेल्डर, टर्नर म्हणूनही त्यांनी काम केले आहे. बारावी पास झाल्यानंतर त्यांनी चालक परवाना काढला आणि वाहनचालक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यांचे मालक त्यांच्यावर पालकांसारखे प्रेम करतात.

https://www.instagram.com/tv/Cfnc0XXvtLs/?utm_source=ig_web_copy_link

त्यांच्याकडे कामाला जाताना प्रतीक यांना कधीच वाटत नाही की, आपण कामावर जातो आहोत. आपण आपल्या दुसऱ्या घरी जातो असेच त्यांना वाटते. प्रतीक परितेकर यांना टीव्ही बघण्याची खूप आवड आहे. आधी त्यांच्याकडे टीव्ही नव्हता. वाहनचालकाची नोकरी लागल्यावर त्यांच्या पहिल्या पगारात त्यांनी टीव्ही विकत घेतला होता. आणि आता ‘कोण होणार करोडपती’च्या मंचामुळे स्वतः टीव्हीवर येणार असल्याने ते खूप खूश झाले आहेत.

आपल्या परिवारासोबत फिरायला जाण्याचे आणि आपल्या परिवाराला घेऊन एकदा फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये राहायचे असे प्रतीक परितेकर यांचे स्वप्न आहे. ‘कोण होणार करोडपती’ शोमध्ये पैसे जिंकून त्यांना स्वतःचे घर बांधायचे आहे. प्रतीक यांच्या या सगळ्या इच्छा ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पूर्ण होतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘खदखद सर’ नितेश कराळे गुरुजीही शनिवारी ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर

दरम्यान, आपल्या वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धा परीक्षेचे धडे देणारे आणि ‘खदखद सर’ म्हणून तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय असणारे नितेश कराळे गुरुजी हेदेखील ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर येणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’च्या या आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे म्हणून ते सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या आठवड्यातल्या विशेष भागात नितेश कराळे गुरुजी कर्नल सुरेश पाटील यांच्या ‘ग्रीन थंब एनव्हायर्नमेंटल प्रोटेक्शन ग्रूप- साथी रे’ या संस्थेसाठी खेळणार आहेत. शनिवारी ९ जुलै रोजी हा भाग प्रदर्शित होणार आहे.

कराळे गुरुजी यांच्यासह कर्नल सुरेश पाटील हेही या विशेष भागात सहभागी होणार आहेत. यु-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या कराळे गुरुजींना या मंचावरून ऐकणे ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धा परीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरुजी हे आता महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले आहेत. वर्धा येथील रहिवासी असलेल्या कराळे गुरुजींनी वऱ्हाडी बोली भाषा आणि शिक्षण यांचा सुरेख मेळ घातला असून, ते आता ‘कोण होणार करोडपती’मध्ये हॉटसीटवर बसून या शोचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.

कोरोना काळात शिकवणीचे वर्ग बंद होते, म्हणून नितेश कराळे यांनी ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे ठरवले. अनेक क्लिष्ट विषय सहज आणि सोप्या पद्धतीने मांडण्याच्या कलेत त्यांचा हातखंडा आहे. त्यावर अस्सल वऱ्हाडी भाषेची फोडणी दिल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कराळे गुरुजींचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले होते. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी कराळे गुरुजी ३०० विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने शिकवायचे. मात्र, कोरोनामुळे शासनाने लॉकडाऊन केले आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू असलेले क्लासेस बंद पडले. मग कराळे गुरुजींनी ऑनलाईन क्लास सुरू केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांना गुगल मीट, झूम अ‍ॅप यांच्या माध्यमातून शिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण त्यातही अडचणी आल्याने त्यांनी यू-ट्यूबवर व्हिडीओ अपलोड केले. हळूहळू त्यांचे प्रेक्षक वाढू लागले. कराळे गुरुजी अस्सल वऱ्हाडी बोलीभाषेतून शिकवतात. ‘खदखदणारा’ ज्वालामुखी, भूगोलातला लाव्हा रस, मराठीतले व्याकरण, इतिहास आणि गणित शिकवतानाही त्यांच्या बोलीमुळे विद्यार्थ्यांना उत्तरे लक्षात राहण्यास चांगलीच मदत होते आहे. आपल्या भाषेतून संपादन केलेले ज्ञान दीर्घकाळ स्मरणात राहते, असे मत कराळे गुरुजींनी ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर व्यक्त केले.

Share