मुंबई : राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यातच राज्यातील आमदार, नेते मंडळींनाही कोरोनाची लागण होत आहे.शिवसेनचे खासदार अरविंद सावंत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत:सावंत यांनी याबाबतची माहिती ट्विट करुन दिली आहे.
खासदार अरविंद सावंत यांनी ट्विट म्हटलं की,माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी असे ट्विट खासदार अरविंद सावंत यांनी केले.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या.!
— Arvind Sawant (@AGSawant) January 4, 2022
कोरोनाच्या या लाटेत राजकीय नेते आणि मंत्र्यांमध्ये कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झालेली दिसून येत आहे. कालच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले. यापूर्वी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील, त्यांची कन्या अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.