मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे महत्वाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे १३ आमदार हे ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. सध्या शिंदे या १३ आमदारांसोबत गुजरातमध्ये आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्याद यांनी ट्विट प्रतिक्रिया दिली आहे.
दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हणाल्या की, एकनाथ शिंदे भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे.. उगाच भाजपाच्या IT Cellच्या लिंबू टिंबुनी सोशल मीडियावर तर्क-वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही, असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
माननीय.एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणनार्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही. @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 21, 2022
दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांची देखील आज दूपारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक होणार आहे. मात्र एकनाथ शिंदे देखील आज दुपारी २ वाजता गुजरातमधून पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात ते आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती समोर येत आहे.