ज्ञानव्यापी मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडले; हिंदू पक्षाच्या वकिलांचा दावा

वाराणसी : बहुचर्चित ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा आजचा तिसरा दिवस आहे. सर्वेक्षणादरम्यान या मशिदीच्या परिसरात असलेल्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी केला आहे. मात्र, हा दावा कितपत खरा आहे याबाबत अद्यापही प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.

उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरातील व्हिडिओ सर्वेक्षण सध्या सुरू आहे. सर्वेक्षणाचे काम गोपनीय पद्धतीने होत असून, न्यायालयाच्या देखरेखीखाली हे काम होत आहे. सर्वेक्षण सुरू असतानाच हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी केलेल्या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडले असल्याचा दावा अॅड. विष्णू जैन यांनी केला आहे. त्या शिवलिंगाच्या सुरक्षेसाठी विष्णू जैन हे न्यायालयात धाव घेणार आहेत. एका वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली आहे.

ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरात सर्वेक्षण करणाऱ्या समितीने नंदी समोरील विहिरीचा सर्व्हे केला. या विहिरीत कॅमेरा टाकून व्हिडिओ सर्वेक्षण केले होते. त्याचबरोबर याआधी पक्षमी दीवार, नमाज स्थळ, वजू स्थळ तसेच तळघरातील सर्वेक्षण करण्यात आले होते.

ज्ञानव्यापी मशिदीच्या परिसरात “स्वस्तिक’ आणि “ओम”चे निशाण आढळल्याचा दावा करण्यात येत आहे. भिंतीवर सापडलेल्या या चिन्हांवर रंगकाम करुन लपवण्यात आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच एक गुप्त तळघरही सापडले असून त्याला कचरा टाकून लपवण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही करण्यात येत आहे.

उद्या अहवाल सादर करणार
सर्वेक्षणाचे काम गोपनीय असून, कोर्टाच्या देखरेखीखाली हे काम होत आहे. सर्वेक्षणस्थळाची माहिती, तसेच त्यात काय आढळले याबद्दलचा अहवाल उद्या १७ मे रोजी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. सर्वेक्षण करणाऱ्या समितीतील एका सदस्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. आज सर्वेक्षण करणारे पथक मशिदीत जात असताना आर. पी. सिंह यांना अडवण्यात आले. ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांना मशिदीत जाण्यापासून अडवण्यात आले. आर. पी. सिंह यांच्यावर गोपनीय माहिती बाहेर लीक केल्याचा आरोप आहे.
Share